आपला जिल्हाप्रादेशिक

राज्य रस्ता २३२ चे भिजत घोंगडे

गेवराईचे आण्णा, अंबाजोगाईच्या ताईंना जमलं माजलगावचे दादा कुठे कमी पडले?

लोकगर्जनान्यूज

बीड : लोखंडी सावरगाव ते पाडळसिंगी हा सर्व सामान्य व इंधन वाचत असल्याने राष्ट्र हिताचा राज्य रस्ता क्र. २३२ मागील जवळपास तीन तप झाले दुर्लक्षित आहे. परंतु मध्यंतरी प्रयत्न करुन गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी पाडळसिंगी ते वडवणी पर्यंत रस्त्याला निधी आणला हे काम युद्ध पातळीवर सुरू असून, केज मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई-आडस रस्त्यासाठी ५० कोटीचा निधी मंजूर करुन घेतला. याही रस्त्याचे सुरू होईल पण याच मार्गावरील आडस ते वडवणी पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके कुठे कमी पडले असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

 

केज, माजलगाव, गेवराई या तीन मतदारसंघातून जाणारा राज्य रस्ता २३२ लोखंडी सावरगाव फाटा, आडस, धारुर, चिंचवण, वडवणी,ताडसोन्ना, पिंपळनेर,कुक्कडगाव, पाचेगाव,पाडळसिंगी असा आहे. या मार्गावरील अनेक गावे आडवळणी असून, देशात,राज्यात अन् जिल्ह्यातही मोठं मोठे रस्ते होत असलेतरी या रस्त्यालगतच्या शेतकरी, सर्व सामान्य जनता खड्डे युक्त रस्त्यावरुन खडतर प्रवास करत आहे. या खड्डेयुक्त रस्त्यामुळे इकडे मालवाहतूक वाहन येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी अडचणी येत आहेत. हा रस्ता झाला तर शेतकऱ्यांची मोठी सोय होणार असून तसेच दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्यानंतर तरुणांना रोजगार मिळेल. तसेच वडवणी, धारुर, माजलगाव तालुक्यातील अनेक रुग्णांना अंबाजोगाई, लातूर येथे दवाखाना, शिक्षणासाठी सोयीचे ठरणार आहे. लातूर,संभाजी नगर ( औरंगाबाद ) , जालन्याचे अंतर ३५ कि.मी. कमी होते. यामुळे सर्वसामान्य जनतेचा पैसा,वेळ अन् राष्ट्राचे इंधन वाचणार आहे. सर्व दृष्टीने पहाता हा जनतेच्या अन् राष्ट्राच्या हिताचा रस्ता जवळपास तीन तप होऊन गेली दुर्लक्षित आहे. परंतु गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील तरुणांनी अनेकवेळा या रस्त्यासाठी आंदोलन केल्यानंतर गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी या राज्य रस्ता क्र. २३२ साठी १४५ कोटी रुपये निधी मंजूर करुन घेतला. या निधीतून पाडळसिंगी ते वडवणी पर्यंत रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही दिवसांत हे काम पुर्ण होईल. त्यामुळे गेवराई मतदारसंघ हद्दीतील या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच २३२ हा मार्ग लोखंडी सावरगाव ते आडस पर्यंत केज मतदारसंघात येतो. अंबाजोगाई ते आडस रस्त्यासाठी आमदार सौ. नमिता मुंदडा यांनी ५० कोटी निधी मंजूर करुन घेतला. याचेही टेंडर निघून काही दिवसात या रस्त्याचे काम सुरू होईल. परंतु आडस ते वडवणी जवळपास ३८ कि.मी. रस्ता माजलगाव मतदार संघात येतो. या रस्त्यासाठी नुकतेच जाहीर झालेल्या बजेट मध्ये निधी न मिळाल्याने हा रस्ता होणार की, नाही? असा प्रश्न जनतेला पडला आहे. गेवराईच्या आण्णांना जमलं, अंबाजोगाईच्या ताईंनीही रस्त्यासाठी निधी घेतला मग आडस ते वडवणी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात माजलगावचे दादा कुठे कमी पडले? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

गुगल मॅप वर राज्य मार्ग१४४ तोही चुकीचा रस्ता

पुर्वी हा रस्ता लातूर ते तीसगाव असा होता. याला राज्य रस्ता क्र. १४४ देण्यात आले. परंतु राज्य रस्ता क्रमांक १४४ चा २३२ होऊन जवळपास १० वर्ष झाले. पण गुगल मॅप वर राज्य रस्ता क्रं. १४४ च दाखविला जातो. तोही चुकीचा मार्ग असून, लातूर कडून आल्यानंतर लोखंडी सावरगाव फाट्यापासून महात्मा बसवेश्वर चौकापासून हा १४४ क्रमांकचा राज्य रस्ता आडसकडे येतो. असा न दाखवता गुगल मॅप वर हा रस्ता लोखंडी सावरगाव पासून केजकडे आणि तेथून धारुरकडे असा चुकीचा दाखविला जातो. त्यामुळे बांधकाम विभागाला ही २३२ हा राज्य रस्ता नकाशावर येऊ नये आणि हा सोयीचा मार्ग खड्डेमय राहिले पाहिजे असे वाटते का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता झालेले राष्ट्रीय महामार्ग गुगल मॅप वर अपडेट झाले आहेत पण १० वर्षांपूर्वी नंबर बदलूनही राज्य रस्ता २३२ गुगल मॅप वर अपडेट का नाही? यालाही काही कोटी बजेट व मंजुरी घ्यावी लागते का? हा जनतेचा प्रश्न आहे.
राज्य मार्ग २३२ खरंच अस्तित्वात आहे का?

बांधकाम विभाने लोखंडी सावरगाव फाटा, आडस, धारुर, चिंचवण वडवणी, ताडसोन्ना पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव, पाडळसिंगी या रस्त्यावर असलेल्या दिशा दर्शक फलकावर व प्रत्येक कि.मी. वर असलेल्या दगडांवर राज्य रस्ता क्र. २३२ लिहिलं आहे. परंतु गुगल मॅपवर MH SH 232 शोधले तर तो किनवट ते महागाव असा दाखवतो. हा घोळ काय? जर लोखंडी सावरगाव ते पाडळसिंगी या मार्गाचा राज्य रस्ता क्र. २३२ आहे तर तो मार्ग का दाखवतो? की बांधकाम विभाग व शासन लोकांना उल्लू बनवत आहे का? असेही प्रश्न जनतेतून उपस्थित करण्यात येत आहे.
याच रस्त्याला निधी कसा नाही?

देश, राज्य, जिल्हा कुठेही नजर टाकली की, रस्त्याची कामे कुठे पुर्ण तर कुठे सुरू असल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्ग नंतर तर कमी वेळात मोठी शहरं कशी गाठता येणार याची स्पर्धा लागलेली दिसते. या रस्त्यांना हजारो कोटींचा निधी मिळत आहे. त्यामुळे शासनाकडे पैशाची कमी नसल्याचे स्पष्ट आहे. या राज्य रस्त्यासाठी पाडळसिंगी ते वडवणी असं पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षी १४५ कोटी निधी दिला अन् ते कामही सुरू आहे. मग दुसऱ्या टप्प्यात वडवणी ते लोखंडी सावरगाव फाटा यासाठी शासनाने फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे याच रस्त्यासाठी निधी कसा नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »