हुश्श…. एकदाचे इंटरनेट ( internet ) सुरू

लोकगर्जनान्यूज
बीड : मराठा आरक्षण आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले अन् बीड, माजलगाव येथे दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इंटरनेट ( internet ) सेवा बंद केली. सलग तीन दिवस इंटरनेट बंद असल्यामुळे अनेक कामे खोळंबली तर ॲन्डरॉइड मोबाईल फक्त फोन घेण्यापुर्ते बनले होते. यामुळे इंटरनेट ( internet ) कधी सुरू होणार? याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले होते. अखेर इंटरनेट सेवा सुरू झाल्याने मोबाईल धारकांचे जीव भांड्यात पडले असून सुटकेचा निःश्वास सोडला.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची दुसरी इनिंग सुरू असून, मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवसांची दिलेली वेळ संपल्यानंतर अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक ठिकाणी गावागावात साखळी उपोषण सुरू झाले. हे सर्व आंदोलन शांततेत सुरू असताना बीड जिल्ह्यात सोमवारी ( दि. ३० ) अचानक हिंसक वळण लागले. माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करुन घर व वाहने जाळण्यात आली. तसेच माजलगाव येथे नगर परिषद कार्यालय जाळण्यात आले. या घटनेचे व्हिडिओ,फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर दुपारी तीनच्या नंतर बीड शहरात जाळपोळ सुरू झाली. मोठा जमाव एकत्र येत प्रथम सुभाष रोडवरील शुभम ज्वेलर्सवर दगडफेक करुन समोर उभ्या दुचाकी जाळण्यात आल्या. त्यानंतर मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर , कार्यालय व वाहने जाळण्यात आली. तसेच राष्ट्रवादी भवन, मस्के, खांडे, गोरे यांचे कार्यालय जाळण्यात आली. अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. सनराईज हॉटेल जाळण्यात आले. यानंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या घडलेल्या घटनेनंतर प्रशासन रस्त्यावर आल्यानंतर या दगडफेक व जाळपोळच्या घटनेवर नियंत्रण मिळालं. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी एक दिवसाची संचार बंदी लागू केली. अफवा पसरवू नये म्हणून इंटरनेट ( internet ) सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून इंटरनेट ( internet ) सेवा बंद होण्यास सु झाली. ती सलग चार दिवस बंद होती. यामुळे हातातील स्मार्टफोन केवळ बोलण्यासाठी वापरला जाऊन लागला. ४८ तासानंतर इंटरनेट ( internet ) सुरू होणार असल्याने काहींनी १२ पर्यंत जागरण केले परंतु सुरू झाले नाही. ९० टक्के लोकांना आता सोशल मीडियाचे पोस्ट, व्हिडिओ सवय लागली असल्याने प्रत्येकजण इंटरनेट ( internet ) कधी सुरू होणार? याची चौकशी करत होता. थोड्या-थोड्या वेळाने मोबाईल चेक करत होता. अखेर इंटरनेट एकदाचे सुरू झाल्याने मोबाईल वापर कर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
इंटरनेट ( internet ) बंदचे काही जणांकडून स्वागत अन् नाराजी!
इंटरनेट बंद केल्याने सर्व वेळ कामात, गप्पा मारण्यात गेल्यानं तसेच रात्री झोपही लवकर लागल्याने या निर्णयाचे काही नागरिकांनी स्वागत केले. परंतु काहींचे नियमित ऑनलाईन काम असणारे, तसेच ज्यांना मोबाईल पहाण्याचे व्यसन लागले त्यांनी मात्र कामे खोळंबली, मन लागत नाही म्हणून तक्रार करत नाराजी व्यक्त केली.
क्रिकेट प्रेमी पर जिल्ह्याच्या हद्दीत
सध्या क्रिकेटचे विश्वचषक ( World Cup ) मॅच सुरू असल्याचे हे मॅच पाहण्यासाठी चक्क पर जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन बसले. यामुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव ( जि. उस्मानाबाद ) येथे मोठी गर्दी जमली होती. तसेच येथील हॉटेल हाऊसफुल्ल होते असे एका क्रिकेट प्रेमीने सांगितले.