Cotton Ret – कापूस पुन्हा तेजीत तीन दिवसांत वाढले इतके भाव
लोकगर्जनान्यूज
धारुर : मागील काही दिवसांपासून कापूस भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे चेहरे सुकले होते. परंतु तीन दिवसांपासून कापूस तेजीत असून, धारुर ( जि. बीड ) कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जिनिंग वर तीन दिवसांत 300 रुपयांनी कापूस वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांतील ही दरवाढ पहाता पुढील चित्र समाधान कारक असेल! अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस बाजारभावाचा अंदाज घेऊन निर्णय घेणं उचित ठरेल.
कापूस म्हणजे पांढरं सोनं, मराठवाडा, विदर्भातील अनेक कोरड वाहु शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवणारा पीक, परंतु यावर विविध प्रकारच्या रोगांनी हल्ला चढवला यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. शेतकऱ्यांचा खर्च निघणं मुश्किल झाले. नगदी पीक हातचे गेल्यानं शेतकरी पुरता हादरून गेला. पण सोयाबीन हे पीक आले. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली. कापसाला मागे टाकत सोयाबीन एक नंबरचे पीक झाले. कापसाचे क्षेत्र घटल्याने ते दोन नंबरवर गेला. परंतु मागील वर्षी कापसाला शेवटपर्यंत 13 हजार असा विक्रमी दर मिळाला. हा दर पाहून सोयाबीनकडे वळलेला शेतकरी पुन्हा कापसाकडे आला. यावर्षी खरीप हंगामात कापूस लागवडीचा टक्का वाढला. यंदा कापसाचे बाजारही 14 ते 13 हजार प्रतिक्विंटल दर याप्रमाणे सुरू झाले. पण जसजसा कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत गेला तसतसा बाजारात भाव पडत गेला. तो इतका खाली की, चक्क 7 हजार 500 पर्यंत गेला. 13 हजार रु. दर पाहिलेल्या शेतकऱ्यांना किमान यंदा 10 हजार तरी दर मिळावा अशी आशा लागली. पण भाव 7500,7600 पेक्षा पुढे सरकण्यास तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस न विकता घरात साठवून ठेवला. भाव वाढ न झाल्याने मार्च महिना संपला तरी शेतकऱ्यांचा कापूस घरातच आहे. परंतु मागील तीन दिवसांपासून धारुर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या जिनिंग चे आज शुक्रवारी ( दि. 31 ) नर्मदा जिनिंग , धारुर 7800, लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7722, नर्मदा कोटेक्स भोपा 7850, विश्र्वतेज जिनिग खोडस ( आडस ) 7803, बालाजी जिनिग फ. जवळा 7806, वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7768 असे दिसून आले. हे दर पहाता प्रतिक्विंटल 300 रु. सुधारणा दिसून येत आहे. ही भाववाढ तीन दिवसांत तीनशे रूपयांनी झाली आहे. दररोज 100 वाढ सध्या सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु नेमकी किती दरवाढ होईल, तेजी किती दिवस राहील याबाबत सध्या तरी कोणीही खात्री देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरुक राहून संपर्कातील बाजारभाव अभ्यासकांशी सल्लामसलत करून कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा.