BEED News दूधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी भुकटी व रसायनाचा ९ लाखांचा साठा जप्त
अन्न व औषध पोलीस प्रशासनाची आष्टी शहरात कारवाई
लोकगर्जनान्यूज
बीड : दूधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी भुकटी व रसायनाच्या साठ्यावर बीडच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून तब्बल 8 लाख 91 हजार 375 रु. माल जप्त केला. सदरील कारवाई आष्टी शहरात करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी फरार आहे. या कारवाईमुळे पांढऱ्या दुधाचा काळा धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आष्टी शहरातील संभाजी नगर भागातील एका खोलीत दूधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी भुकटी व रसायनाचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त बीड, सय्यद इम्रान हाश्मी यांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन सदरील ठिकाणी छापा टाकला, यामध्ये 132 भुकटीच्या गोण्या, 220 पत्र्याचे डब्बे जप्त करण्यात आले. याचा वापर दूधात भेसळ करुन तो विकला जात असे. याप्रकरणी जगदंबा मिल्क ॲन्ड मिल्क प्रॉडक्टचे सतीश नागनाथ शिंदे व नंदू मेमाणे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदू मेमाणे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर सतीश शिंदे फरार आहे. सदरील कारवाई अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे.