हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून तीन महिने संपत आले शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षाच
शासनाकडून सोयाबीन घेऊन शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

लोकगर्जनान्यूज
बीड : शासनाने हमीभाव केंद्राच्या माध्यमातून रडत पडत सोयाबीन खरेदी केली. पण सोयाबीन विकून तीन ते चार महिने होत आले आहेत पण अद्यापही अनेक शेतकऱ्यांना याची रक्कमच मिळाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सध्या शेती मशागतीची कामे सुरू असल्याने पैशाची गरज भासत आहे. यामुळे शेतकरी खाजगी सावकाराचे उंबरे झिजवत आहे. यामुळे शासनाने सोयाबीन खरेदी केलं पण शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
चार वर्षांपूर्वी १२ हजारांवर गेलेले सोयाबीन यार्षी चक्क ४ हजारांवर येऊन आपटले आहे. या दराने सोयाबीन विकले तर शेतकऱ्यांचा खर्च निघणं मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे. पावसाचा लहरीपणा, विविध रोगांचा प्रादुर्भावातून वाचून शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीन पडले, ते बाजारात घेऊन गेले तर बाजारात ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये दर मिळत होता. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठी ओरड झाली होती. ही ओरड थांबविण्यासाठी शासनाने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. पण हे खरेदी केंद्र सुरू कमी अन् बंदच जास्त राहिल्याचे चित्र दिसून आले. यासाठी बारदाणा उपलब्ध नाही असे कारण देण्यात आले. यामुळे रडत पडत सोयाबीन हमीभावाने खरेदी केला. पण तोही अर्ध्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात पडून असतानाच खरेदी बंद केली. यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणार म्हणून सांगितले यामुळे शेतकरी १०-१० दिवस काटा होईल म्हणून वाहने उभे करून खरेदी झाली नाही. यामुळे भाडे तत्वावर आणलेल्या वाहनांचा बोजा विनाकारण शेतकऱ्यांना सोसावा लागला पण खरेदी काही झाली नाही. यामुळे शेतकऱ्यानी बाजार समिती आणि खुल्या बाजारात सोयाबीन विकून टाकले. अनेक अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावने खरेदी केले त्यांचे पैसेही अद्याप मिळालेले नसल्याचे सांगितले जात आहे. जवळपास तीन महिने होत आले असून शेतकऱ्यांनी सोयाबीन टाकून पण पैसे न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. पेरणीच्या दिवसांत खत महाग होतो यामुळे काही शेतकरी आताच खत खरेदी करतात पण पैसेच हातात नसल्यानें ते हातावर हात ठेवून बसले आहेत. यामुळे बाजार पेठेवरही परिणाम दिसत असून, लग्नसराई सुरू असताना बाजारात शुकशुकाट आहे. यामुळे शासनाने सोयाबीन खरेदी करुन शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आता वाढला दर; शेतकरी संतप्त
शेतकऱ्यांनी दर वाढ होण्याची शक्यता नाही असेच चित्र आणि सांगितले जात असल्याने शेतकरी ३ हजार ८०० ते ४ हजार प्रतिक्विंटल दराने वाकून मोकळा झाला. या दराने सोयाबीन विकल्याने शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही. पण शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपताच बाजारात भाववाढ झाली आहे. सध्या सोयाबीन प्रक्रिया उद्योग सोयाबीन ४ हजार ७०० ते ८०० रु. प्रतिक्विंटल तर बाजार समिती मध्ये ४ हजार ५०० दर मिळत आहे. ही दरवाढ पहाता शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत असून याला केवळ शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
शासनाचे हमीभाव फक्त सहानुभूती साठी
शासनाने यावर्षी सोयाबीनला ४ हजार ८९२ आणि कापसाला ७ हजार ५२१ प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे. पण बाजारात या हमीभावाला काहीच किंमत न देता सोयाबीन ३ हजार ८०० ते ४ हजाराने तर कापूस ६ हजार ९०० ते ७ हजार १०० या दराने विकले गेले. यामुळे शासनाचे हमीभाव फक्त शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी असून या हमीभावाला बाजारात व्यापारी काही किंमत देत नाहीत असेच चित्र आहे.