केजमध्ये सत्तासंघर्ष पेटला! कामांच्या आडवा आडवीने तालुक्याच्या विकासाला खीळ

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील एका पुढाऱ्याने राजकीय बळावर काही कोटींची रोहयो विभागाकडून विकास कामे मंजूर करुन आणली. दुसऱ्या एका पुढाऱ्याला हे पटलं नाही. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरुन त्या कामांना मंजुरी देऊ नये म्हणून दबाव टाकला. हे दोन्ही पुढारी सत्ताधारी पक्षाचे केज तालुक्यातील मातब्बर असल्याने गटविकास अधिकारी रजेवर गेले. यामुळे सामान्य लोकांच्या कामाचा खोळंबा झाला. तसेच तब्बल ४ कोटीची कामे रखडल्याने या मातब्बर पुढाऱ्यांच्या अंतर्गत कल्हाचा फटका तालुक्याच्या विकासाला बसत असल्याने जनतेत असंतोष पसरला आहे.
केज तालुक्यातील १७ गावातील ४ कोटी ३० लाखांचे २७ सिमेंट व पेव्हर ब्लॉक रस्त्यांना राज्याच्या रोजगार हमी विभागाने मंजुरी दिली. पंचायत समिती स्तरावरील मंजुरी व कार्यारंभ आदेश राहिलं आहे. परंतु या कामांना मंजुरी देऊ नये म्हणून एका पुढाऱ्याने दबाव वाढवला पण कामे तर मंत्रालयातून मंजुर असल्याने रोखावे कसे असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. ज्या पुढाऱ्याने ही कामे आणली आहेत त्यानेही मंजुरी द्या म्हणून तगादा लावला. रोखणारे आणि मंजुरी द्या म्हणणारे दोन्ही पुढारी मातब्बर आहेत. त्यामुळे ऐकावं कोणाचं म्हणून मागील दिड महिन्यांपासून यावर काहीच निर्णय झाला नाही. या अंतर्गत कलहामुळे तालुक्याचा ४ कोटी ३० लाखांचा विकास निधी पडून आहे. ही कामं नाही झाली तरी पुढाऱ्यांचे काहीचं नुकसान नाही. परंतु १७ गावातील नागरिक रस्त्यापासून वंचित राहणार आहे. पर्यायाने केज तालुक्याचे नुकसान होणार. यापुढे ही अशीच अवस्था राहिली तर केज तालुक्याच्या विकासाला खीळ बसणार अशी चर्चा नागरिक करीत आहेत. या पुढाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केजचे गटविकास अधिकारी रजेवर गेल्याची तालुकाभर जोरदार चर्चा आहे. गटविकास अधिकारी रजेवर गेल्याने ही कामे तर थांबली पण सर्वसामान्य जनतेच्या विविध कामांचा खोळंबा झाला आहे.
या गावत होणार विकास कामे!
विडा, दैठणा, शिरुरघाट, कवडगाव, कोरेगाव, आंधळेवाडी, गदळेवाडी, सांगवी ( सा. ), वरपगाव, कापरेवाडी, काशिदवाडी, नागझरी, नांदूरघाट, घाटेवाडी, कोरडेवाडी, डोणगाव, पिसेगाव