स्त्री शक्तीचा मान! केज तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला दारु बंदीचा ठराव

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील कळमअंबा येथील महिलांच्या मागणीवरून ग्रामपंचायतीने गावातील अवैध दारू विक्री विरोधात ठराव घेतला आहे. दारु बंदीसाठी ठराव घेतल्याने महिलांनी सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत.
कळमअंबा येथे मागील काही महिन्यांपासून गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढली आहे. यामुळे अनेकजण दारुच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या तळीरामांचा महिला व बालकांना त्रास होत आहे. सहज गावात दारु मिळत असल्याने अनेक तरुणाई या दारुच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येऊन सरपंच शशिकांत इंगळे यांच्याकडे गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेण्याची मागणी केली. स्त्री शक्तीचा मान राखत ग्रामपंचायतीने कसलाही वेळ न घालवता मंगळवारी ( दि. २ ) विशेष बैठक बोलावून दारु बंदीचा ठराव घेतला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या तेजस्वी राणु हिरवे यांनी अवैध दारू विक्री विरोधात ठराव सूचवला तर यास ग्रामपंचायत सदस्या शोभा सतीश घाडगे यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते दारु बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे आता गावातील महिलांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.