सोयाबीनचे दर सह दिवसात इतके घसरले; शेतकरी चिंतेत
गेल्यावर्षीचे अन् यावर्षीचेही सोयाबीन थप्पीलाच

लोकगर्जनान्यूज
बीड : मागील पाच दिवसांपासून दररोज सोयाबीन दरात थोडी-थोडी घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षीही दर वाढतील म्हणून सोयाबीन घरातच ठेवले तर, यावर्षीही अद्याप सोयाबीन विकले नाही. दर वाढण्याऐवजी घसरत असल्यामुळे नेमकं काय करायचं? असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सोयाबीन दर वाढतील असा बाजार अभ्यासक अंदाज व्यक्त करत आहेत. पण नेमके कधी वाढणार? हे स्पष्ट सांगितले जात नाही केवळ तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
मागे सोयाबीन तब्बल १२ हजार प्रतिक्विंटल अशा विक्रमी दरापर्यंत गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना निदान ७-८ हजार रुपये दर मिळावा अशी अपेक्षा आहे. परंतु सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे दर वाढताना दिसत नाहीत. चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करणार, अमेरिका बायो इंधनासाठी सोयाबीनचा वापर करणार, केंद्र सरकारने आता खाद्य तेल आयात करण्यासाठी पुन्हा शुल्क लावलं आहे. यावरून सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज मागील महिन्यापासून लावलं जात आहे. पण बाजाराचा विचार केला तर दरांची घसरण सुरूच आहे. अनेक ठिकाणी सध्या सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३७० प्रतिक्विंटल या प्रमाणे दर मिळत आहेत. गुरुवार ( दि. १९ ) ते बुधवार ( दि. २५ ) या सहा दिवसांत तब्बल प्रतिक्विंटल १५० रु. घट झाली आहे. ही दरांची मंदी नेमकी किती दिवस रहाणार याचा शेतकऱ्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे सोयाबीन शिकावं की, ठेवावे अशा दुविधेत शेतकरी दिसत आहे.
*काही शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे सोयाबीन तसेच
दर वाढतील या आशेने मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवणं पसंत केले. यात जवळपास मोठे शेतकरी आहेत. परंतु मागील वर्षीही अपेक्षित दर मिळाला नाही. यावर्षी त्यापेक्षा बाजाराची वाईट अवस्था आहे. त्यामुळे मागील वर्षीचे व यावर्षीचे सोयाबीन घरातच असल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत.
*लहान व्यापाऱ्यांचे नुकसान
सोयाबीन दरात चढ उतार सतत सुरू आहेत. प्रत्येक दिवशी अथवा दिवसांतून दोन वेळा दर बदलत आहेत. बाजार स्थिर नसल्याने या तेजी मंदीचा फटका अनेक लहान सहान व्यापाऱ्यांना बसतो आहे.