सिरसाळ्या जवळ भीषण अपघात; दोन ठार दोन गंभीर
लोकगर्जना न्यूज
परळी : बीड-परळी महामार्गावर आज मंगळवारी ( दि. ३० ) सिरसाळा येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघाताची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सिरसाळा पोलीसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मयतामध्ये महिला पोलीस कर्मचारी व त्यांच्या मुलाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दिंद्रुड पोलीस ठाणे येथे कार्यरत महिला पोलीस कोमल शिंदे या त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आजारी असल्याने त्यास कार क्रमांक एम.एच. १४ जी वाय ९११३ मध्ये परळीकडे घेऊन जात होत्या. दरम्यान सिरसाळा येथील परळी रस्त्यावरील प्रगती मंगल कार्यालय समोर परळी येथून येत असलेली कार एम. एच. ४७ – ५३२६ या दोन्ही कारची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात महिला पोलीस कोमल मारुती शिंदे व त्यांच्या अथर्व शिंदे सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर शिंदे यांच्या वाहनाचे चालक नवनाथ लटपटे व समोरील वाहनातील डॉ. इलियास हे गंभीर जखमी आहेत. सिरसाळा पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने धडकून रस्त्याच्या खाली खड्ड्यात एकमेकांवर पडले आहेत. बीड जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या घटना पहाता चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.