शेतीसाठी दिवसा १२ तास वीजपुरवठा शासनाचा निर्णय पण ‘या’पाच जिल्ह्यांसाठीच

लोकगर्जनान्यूज
शेती पंपासाठी १२ तास वीजपुरवठा देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, तसे महावितरणला ३० नोव्हेंबर रोजी आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. परंतु हा निर्णय केवळ पाच जिल्ह्यांसाठी आहे. यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच घोडं मारलं का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याने इतर जिल्ह्यांतील नेते यासाठी प्रयत्न करतील का? की, फक्त शेतकऱ्यांचा कोरडा कैवार दाखविणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील शेती पंपासाठी रात्री बेरात्री वीजपुरवठा करण्यात येतो. पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना वीजपुरवठा असेल तेव्हा शेतात पाणी देण्यासाठी जावं लागतं. अंधारात जाणे पिकांना पाणी देणं शेतकऱ्यांच्या जिवावर बेतल्याचे काही उदाहरणे आहेत. या रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु याबाबत शासनाने कांहीच निर्णय घेतला नाही. परंतु राज्य शासनाने विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या पाच जिल्ह्यांतील शेती पंपासाठी थ्री फेज दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारच्या कामगार , उद्योग, उर्जा विभागाने ३० नोव्हेंबरला पत्राद्वारे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना आदेश दिले आहेत. या जिल्ह्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा मिळावं म्हणून वने व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे प्रयत्नशील होते. हे पाच जिल्हे धान उत्पादक असून, रात्री पाणी देण्यासाठी वन्यप्राण्यांच्या मोठा धोका असल्याचे निदर्शनास आणून ना. मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पाच जिल्ह्यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी केली. याची दखल घेऊन राज्य सरकारने आदेशही दिले आहेत. यामुळे नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु जे मुनगंटीवार यांना जमलं ते राज्यातील इतर जिल्ह्यांतील पुढाऱ्यांना का जमत नाही? जमत असेल तर ते यासाठी प्रयत्न करणार का? की, केवळ मतं पदरात पाडून घेण्यासाठी आम्हीच शेतकऱ्यांचे खरे कैवारी असल्याचा आव आणणारं असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.