शांतता बैठक;कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही- ASP कविता नेरकर
गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी शांतता व विश्वास आवश्यक - रमेशराव आडसकर
लोकगर्जनान्यूज
केज : कुठेही काही चुकीचे घडत असेल तर पोलीसांना माहिती द्या, कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक ( AsP ) कविता नेरकर यांनी केले तर गाव प्रगती पथावर असून यापुढे घेऊन जाण्यासाठी गावात शांतता व विश्वास म्हत्वाचा असून यापुढे गावाच्या शांततेला तडा जाऊ देऊ नका असे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले. ते तालुक्यातील आडस येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना म्हणाले आहेत.
तालुक्यातील आडस येथे शनिवारी घडलेल्या अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ( दि. 7 ) सकाळी साडेदहा वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपाचे नेते रमेशराव आडसकर, अप्पर पोलीस अधीक्षक Asp कविता नेरकर, धारुर पोलीस ठाणे प्रभारी विजय आटोळे, युवा नेते ऋषिकेश आडसकर, चेअरमन उद्धवराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना Asp कविता नेरकर म्हणाल्या की, दोन वर्षे झाले मी जिल्ह्यात काम करते पण आडस गावाबाबतीत कधीच काही चुकीचे ऐकण्यात आले नाही. पण शनिवार फोन आला आणि मला विश्वास बसला नाही. परंतु हा प्रकार सोशल मीडियामुळे झाल्याचे स्पष्ट आहे. यामुळे पालकांनी आपली मुले काय करतात, कोणाच्या संगतीत आहेत हे पहाणे गरजेचे आहे. तसेच कुठं काही चुकीचे घडत असेल तर पोलिसांना माहिती द्या. कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेतला तर त्याची गय न करता प्रशासन कडक कारवाई करणार. आपल्या तरुणांमध्ये खूप उर्जा आहे परंतु ती चुकीच्या मार्गावर खर्च होत असून, प्रशासनात अधिकारी, कर्मचारी होण्यासाठी उर्जा खर्च करुन सत्कारासाठी बोलवा असे आवाहन केले. तसेच जेष्ठ नेते रमेशराव आडसकर म्हणाले की, हे आपलं गाव एक कुटुंब आहे. येथे असे प्रकार घडत नाहीत. परंतु काही जणांमुळे हे घडलं पण यापुढे हे सहन करणार नाही. कोणी चुक केली तर त्याला शंभर टक्के शिक्षा मिळणार. गाव प्रगतीपथावर असून आणखी विकासात पुढं जायचं असेल तर शांततेची गरज आहे. यामुळे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नये. काहीही चुकीचे घडत असेल तर पोलीस प्रशासनाकडे तक्रार करा असे आवाहन केले. यावे Asp पंकज कुमावत यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी यापुढे असा प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली. प्रस्ताविक सपोनि विजय आटोळे यांनी केले. आभार रामदास साबळे यांनी मानले. यावेळी गावातील ग्रामस्थ,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.