मोबाईलचा योग्य उपयोग:’यूट्यूब’वरील व्हिडिओ पाहून त्याने डॉक्टर होण्याचे केले स्वप्न साकार
केज तालुक्यातील जिद्दी तरुणाची सक्सेस स्टोरी

लोकगर्जनान्यूज
केज : मोबाईलने मुलं चुकीच्या मार्गाला लागत असल्याची प्रत्येकाची तक्रार आहे. परंतु याला आडस ( ता. केज ) येथील तरुणाने छेद दिला. नावंच विजय असलेल्या या जिद्दी तरुणाने कोणतेही क्लासेस न लावता सेल्फ स्टडी व मोबाईलवर यूट्यूबचे व्हिडिओ पाहून नीट परिक्षा दुसऱ्या प्रयत्नात सर केली. त्याचा जळगाव येथे एमबीबीएसला नंबर लागला आहे. केवळ अभ्यास व जिद्दीच्या बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. या यशाबद्दल विजयचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
विजय अंगद पत्रवाळे रा. आडस ( ता. केज ) असे या जिद्दी तरुणाचे नाव. विजयचे १ ते ५ प्राथमिक शिक्षण आडस येथील शाळेत झाले. ६ ते १० माध्यमिक शिक्षण अंबाजोगाई येथे तर ११-१२ उच्च माध्यमिक शिक्षण उकडगाव येथे झाले. विजयला उकडगाव येथे नीट व स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली. त्याने डॉक्टर होण्याचे निश्चित केले. परंतु घराची परिस्थिती अत्यंत नाजूक, डॉक्टर होण्यासाठी नीट परीक्षा पास होणे आवश्यक आहे. यासाठी क्लासेस लावणं गरजेचं असून, अनेक पालक आपल्या मुलांना लाखो रुपये खर्च करून क्लासेस लावतात. पण आपल्याकडे कुठं इतके पैसे आहेत. घरच्यांना सांगून त्याने एक स्मार्ट मोबाईल घ्यायला लावलं. मोबाईल मिळाला पण त्यासाठी रिचार्ज कसा करायचा हा प्रश्न समोर उभा राहिला. मग कसं बसं महिना भरात पॉकेट मनी म्हणून आलेल्या पैशातून १८० रु. रिचार्ज करायचं. जे विषय समजत नव्हते त्याबाबत यूट्यूबचे व्हिडिओ पहायचा. अभ्यास सुरू होता. पहिल्या वेळी परिक्षा दिली तेंव्हा ५०५ मार्क पडले. कुठेच नंबर लागला नाही. परंतु यामुळे नाराज न होता विजयने काय? चुकलं याचा अभ्यास केला. परत रिपीट केले. घरी अभ्यासासाठी वेगळी खोली नसल्याने अडचणी येत होत्या. त्यानं पुन्हा आई-वडील, चुलते यांना तुम्ही फक्त मेस आणि रुम भाडे द्या मी अभ्यास करुन डॉक्टर होतो. असा विश्वास दिला. त्याच्यावर विश्वास दाखवून लातूर येथे पाठवून दिले. लातूर येथे राहून कुठलेही क्लासेस न लावता विजयने अभ्यास सुरू ठेवला. मोबाईलचा योग्य वापर करत यूट्यूब वर्षाला ४ हजार रुपये फीस असलेले क्लासेस अटेंड करत त्याने दुसऱ्या प्रयत्नात नीट परीक्षेत ७२० पैकी ५५२ गुण घेतले. विजयचा एमबीबीएसला दुसऱ्या यादीत जळगाव येथील डॉ. उलास पाटील मेडीकल कॉलेजला नंबर लागला व ॲडमिशनही झाले. हे यश विजयने केवळ जिद्दीने अभ्यास करुन मिळवल्याने अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच आडस येथील अम्बिशन कोचिंग क्लासेस, वैद्यनाथ अर्बन मल्टीपल निधी लि. आडस येथे सत्कार करुन विजय पत्रवाळे यास शुभेच्छा दिल्या.
मोबाईलचा योग्य वापर
मोबाईल व टिव्ही मुळे लेकरं अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत. व्हिडिओ गेम सह आदि गोष्टीत वाहून जाऊन त्यांचे शैक्षणिक, वैचारिक असे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नियमित आहेत. पण याच मोबाईलचा योग्य वापर केला तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण आडस येथील विजय पत्रवाळे याचे देता येईल. घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने विजयने यूट्यूब व्हिडिओ पाहून स्वतःचे व कुटुंबाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही आदर्श असा गुण असून, आपण मिळालेल्या आधुनिक साधनांचा योग्य वापर करुन प्रगती साधावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.