आपला जिल्हा

वाळू माफिया व प्रशासनाच्या वादाचा बीड जिल्ह्यात दुसरा अध्याय? रेट कार्ड नंतर तहसीदारांवर गुन्हा नोंद अन् महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद

लोकगर्जना न्यूज

यापुर्वी वाळू माफियांनी खाल पासून वरपर्यंत देत असलेल्या हप्त्यांचे रेट कार्ड व्हायरल करुन खळबळ उडवून दिली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. हा पहिला अध्याय होता तर, आता चक्क तहसीलदारांना कार्यालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न तसेच महिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आज जिल्हा भरात महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. यामुळे जिल्ह्यात आज महसूलचे काम ठप्प झाले आहे. हा वाळू माफिया व प्रशासनाच्या वादाचा दुसरा अध्याय सुरू असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यामधून करण्यात येत आहे.

अवैध धंद्ये करणाऱ्यांमध्ये नियमित प्रशासनाची दहशत आसली पाहिजे, जिथं अशी परिस्थिती आहे तेथील प्रशासन आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावत असल्याचे प्रतीक समजले जाते. परंतु बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची दहशत आहे की, प्रशासनाची याचा जिल्ह्यातील जनतेला कोडं पडलं आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी वाळू माफिया कडून एक रेट कार्ड व्हायरल करण्यात आले होते. त्यामध्ये खाल पासून वरपर्यंत कोणाला किती द्यावे लागतात हे आकडे होते. यानंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. त्यावेळी आता हा गोरखधंदा बंद होईल असे सामान्य जनतेला वाटत होते. परंतु काही चौकश्या सुरू झाल्याचं दिसून आले. परंतु अवैध वाळू उपसा नियमित सुरुच होता. मात्र यानंतर वाळूचे भाव गगनाला भिडले हा बदल प्रकर्षाने जाणवले. रेट कार्ड हा पहिला अध्याय लोक विसरत चालले होते ते दुसरा अध्याय सुरू झाला असे चित्र दिसून येत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यानंतर वाळू माफियांनी तहसील कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या तसेच तहसीलदार यांच्या घरी जाऊन अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला. यानंतर तहसीलदार खाडे हे कार्यालयात जाताना शासकीय गाडी अडवून त्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. यानंतर महिलांच्या तक्रारीवरून तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हा खोटा गुन्हा असल्याचे सांगत याचा निषेध म्हणून कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने आज लेखणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. यावरून आज जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आच महसूलचे काम ठप्प आहे. हे पहाता प्रशासन व वाळू माफियांच्या अंतर्गत वादाचा दुसरा अध्याय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. अवैध वाळू उपशावर तातडीने पावले नाही उचलली तर याची झळ सामान्य जनतेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तहसीलदार यांना वाळू व्यवसायात गुंतलेली लोक मोजण्यास तयार नाही तिथे सामान्यांच काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »