धारुर, पाटोदा, बीड या तीन अपघातात दोन ठार; दोन जखमी

लोकगर्जना न्यूज
बीड : जवळ छत्रपती संभाजी महाराज चौकात एका अज्ञात वाहनाने पायी चालत असलेल्या व्यक्तीला चिरडले, दुसरी घटना धारुर घाटात एसटी व कारची समोरासमोर धडक झाली यात दोघं जखमी तर तिसरा अपघात मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर घडला. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला. असे जिल्ह्यात तीन अपघातात दोन ठार:दोन गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी ( दि. ९ ) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरापासून जवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात अज्ञात वाहनाने पायी चालत असलेल्या एका व्यक्तीला चिरडून वाहनधारक पळून गेला. यामध्ये सदरील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे बीड ग्रामीण पोलीस प्रयत्न करत होते. अखेर यात यश येऊन सकाळी ओळख पटली असून सुर्यकांत केशव राऊत ( वय ३३ वर्ष ) रा. पाली ( ता. बीड ) असे मयताचे नाव असल्याचे समजले. दुसरा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धारुर घाटात घडला आहे. एका दुचाकीला वाचवताना स्विफ्ट डिझायर क्रमांक एम. एच. ४४ एस ९१०५ व राज्य परिवहन महामंडळाची धारुर -बीड बस क्रमांक एम.एच. २० बी एल २९३० या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये रोहिदास शिंदे व प्रल्हाद गव्हाणे हे दोघे गंभीर जखमी झाले असून यांच्या गावाचे नाव समजु शकली नाही. तिसरा अपघात आज शनिवारी ( दि. १० ) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर महाजनवाडी फाट्यावर घडला. कार क्रमांक एम.एच. ०६ सी डी २७५७ ही अंबाजोगाई कडे चालली होती तर दुचाकी क्रमांक एम.एच. २३ बी ई ३३९८ ही पाटोदा कडे चालली होती. दरम्यान महाजनवाडी फाट्यावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार अजय बबन तायेडे ( वय २३ वर्ष ) हा तरुण जागीच ठार झाला. रात्री ११:३० ते दुपारी २ दरम्यान जिल्ह्यात तीन अपघात घडले यामध्ये दोन तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. दोघं जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबणार तरी कधी? असा प्रश्न जिल्हा वासियांना पडला आहे.