लेखी आश्वासनानंतर आडस येथील आंदोलन मागे
कार्यकारी अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेची निकामी इमारत पाडण्यात यावी यासाठी मागील सहा दिवसांपासून आंदोलन सुरू होते. बुधवारी ( दि. १७ ) जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी यांनी ७ दिवसात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सविता आकुसकर यांनी सहाव्या दिवशी आंदोलन मागे घेतले.
येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची जुनी इमारत निकामी झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असल्याने ही इमारत पाडण्यात यावी यांसह विविध मागण्यासाठी सविता आकुसकर यांनी शुक्रवार ( दि. १२ ) पासून शाळेतच बेमुदत आंदोलन सुरू केले. यापुर्वीही याच मागणीसाठी दोन वेळा आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चांदवडकर एस.डी. यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्या सविता आकुसकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. परंतु समाधान होत नसल्याने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना आंदोलनकर्त्यांची मागण्या सांगून त्यांच्या आदेशानुसार व प्रतिनिधी म्हणून राजेंद्र मोराळे ( गटविकास अधिकारी, केज ) यांना प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्यांनी ७ दिवसात इमारत पाडण्याची कार्यालयीन कारवाई पुर्ण करण्याचे यासाठी एक अभियंता नियुक्त करुन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर नारळ पाणी घेऊन सविता आकुसकर यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी भिसे डी. आय. ( उप अभियंता, केज ), सय्यद एम. एल. ( शाखा अभियंता), गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, सरपंच बालासाहेब ढोले, शिवरुद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, सुषमा आकुसकर, विकास काशिद, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी आदिंची उपस्थिती होती.