भीषण अपघातात बाप-लेक ठार;बीड जिल्ह्यातील घटना

गेवराई : ट्रॅक्टर व पिकअप या दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात बाप-लेक ठार झाले असून मुलगी व इतर दोन असे तिघे जखमी झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रस्त्यावर रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बाप-लेक जागीच ठार झाले असून जखमींवर बीडच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व पिकअप या दोन वाहनांची बुधवारी ( दि. १६ ) रात्री ११ च्या सुमारास राक्षसभुवन रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरात होती की, आवाज ऐकून काय झाले? म्हणून ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. समोरील घटना पाहून अंगावर काटा उभा राहिला. तातडीने अपघातग्रस्तांना मदत करत सर्वांना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातामध्ये चंद्रशेखर रामराज पाठक ( वय ३९ वर्ष ) रा. राक्षसभुवन ता. गेवराई, मुलगा आर्यन हे बाप-लेक ठार झाले असून पाठक यांची मुलगी मंजरी हीच्यासह इतर दोन असे तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने राक्षसभुवन येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात वाढ झाली असून, दरवर्षी या घटना घडतात. मात्र प्रशासनाच्या सूचनांकडे ऊस वाहतूक करणारी वाहनांचे चालक व मालक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कडक मोहिम राबवून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह इतर वाहनांना रेडीयम ( रेफलेक्टर ) बसविण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.