मतदानासाठी गावी येणाऱ्यांचा बारा तासातील दुसरा अपघात: तिघे गंभीर जखमी

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील साबला येथील एक कुटुंब मतदानासाठी पुणे येथून कारमध्ये गावाकडे येताना केज-बीड रस्त्यावर पिंपळगाव फाट्यावर कार व ट्रकची धडक होऊन घडलेल्या अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मतदानासाठी येणाऱ्यांचा रात्री पासूनचा हा दुसरा अपघात आहे.
रात्रीच औरंगाबाद येथून मतदानासाठी दुचाकीवरून येताना नेकनूर – मांजरसुंबा दरम्यान अपघात होऊन केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील दुचाकीस्वार तरुण ठार झाला. तर आज रविवारी ( दि. १८ ) सकाळी ९:३० वाजता पुन्हा केज तालुक्यातील कुटुंबाच्या कारचा अपघात घडला आहे. साबला ( ता. केज ) येथील कुटुंब पुणे येथे वास्तव्यास आहे. ते एका कारने मतदानासाठी गावी साबला येथे येत होते. दरम्यान ते केज-बीड रस्त्यावर पिंपळगाव फाट्याजवळ आले असता त्यांच्या कार व ट्रकची धडक झाली. यामध्ये सतीश परळकर, सुबीद्रा परळकर आणि चालक सिध्दू कांबळे हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी १०८ ला फोन करुन रुग्णवाहिका बोलावून तातडीने जखमींना केज येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मतदानासाठी येणाऱ्यांचा हा १२ तासातील दुसरा अपघात असल्याने काळजी घ्या असे आवाहन करण्यात येत आहे.