क्राईम

बीड जिल्ह्यात हळहळ! दोन अपघातात १० ठार!

रुग्णवाहिकेची ट्रकला धडक तर ट्रॅव्हल पलटली

लोकगर्जनान्यूज

बीड : अहमदनगरला रुग्ण घेऊन जाताना ट्रकला धडकून रुग्णवाहिकेचा अपघात घडला यामध्ये चारजण ठार झाले.दुसरा अपघात मुंबई येथून बीडकडे येत असलेली ट्रॅव्हल पलटी होऊन सहाजण ठार झाले. हे दोन्ही अपघात आष्टी तालुक्यात घडले आहेत. या दोन अपघातात १० जण ठार झाल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर येथे रुग्ण घेऊन जात असलेली रुग्णवाहिका क्र. एम.एच. १६ क्यू ९५०७ ने दौलावडगाव ( ता. आष्टी ) जवळ ट्रक क्र. एम.एच. २१ एक्स ८६०० पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे घडलेल्या अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे ( वय ३५ वर्ष ) रा. धामनगाव ( ता. आष्टी ), पप्पु पांगु तिरपुडे ,मनोज पांगु तिरपुडे दोघे रा. जाटदेवळा ( ता. पाथर्डी जि. अहमदनगर ) या तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के ( वय ३५ वर्ष ) रा. सांगवी पाटण ( ता. आष्टी ) यांचा उपचारादरम्यान अहमदनगर येथे दवाखान्यात मृत्यू झाला. या अपघातात चार जण ठार झाले असून ज्ञानदेव सुर्यभान घुमरे ( वय ४५ वर्ष ) रा. घाट पिंपरी ( ता. आष्टी ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील एक दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदरील अपघात बुधवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
दुसरा अपघात आज सकाळी ट्रॅव्हल पलटी होऊन सहा ठार
मुंबई येथून बीडकडे येत असलेल्या ट्रॅव्हल चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ट्रॅव्हल पलटी होऊन आष्टी पोलीस ठाणे हद्दीत चिंचपूर जवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सहाजण ठार झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमींना आष्टी व जामखेड येथील दवाखान्यात दाखल केले. या दोन अपघातात १० ठार झाल्याची बातमी जिल्ह्यात सकाळी वाऱ्यासारखी पसरली असून याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रॅव्हल अपघातातील मृत व जखमींची नावं अद्याप समजू शकली नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »