बीड जिल्ह्यात लाचखोरी वाढली: आजही एका तहसील मध्ये लिपिक ACB च्या जाळ्यात
लोकगर्जनान्यूज
धारुर : येथील तहसील कार्यालयातील लिपिक लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( ACB ) च्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई आज शुक्रवारी ( दि. २ ) साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजे ( दि. ३१ ) पाटोदा व वडवणी तालुक्यात दोन लाचखोर लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलेले आहेत. यानंतर लगेचच आज शुक्रवारी ( दि. २ ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB ) लाचेचा सापळा यशस्वी केला. आसरडोह ( ता. धारुर ) येथील एका स्मशानभूमीची नोंद घेण्यासाठी धारुर तहसील कार्यालयातील लिपिक महेश कोकरे याने २ हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( ACB ) कडे तक्रार केली. या तक्रारी वरुन लाचेचा सापळा लावून लिपिक महेश कोकरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे धारुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील वाढती लाचखोरी पहाता चिंता व्यक्त केली जात आहे.