बीड जिल्ह्यात दिवसभरात दोन लाचखोर ACB च्या जाळ्यात
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात दोन कर्मचारी शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या ( ACB ) जाळ्यात अडकले आहेत. एक कृषी सहाय्यक तर दुसरा ग्रामसेवक आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून आंदोलन सुरू होतं. तेंव्हा हेच कर्मचारी शेतकरी पुत्र असल्याचे सांगत होते परंतु तेच आता शेतकऱ्यांना लुटताना दिसत असल्याने यांना शेतकरी पुत्र असल्याचा लवकरच विसर पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पाटोदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत कृषी सहाय्यक कृष्णा महादेव आगलावे ( अतिरिक्त पदभार मंडळ कृषी अधिकारी क्र. 2 ) याने तक्रारदार शेतकरी यास कांदाचाळचे काम पुर्ण झाल्याचा पाहणी अहवाल व अनुदान देण्यासाठी बील अपलोड करण्यासाठी पंचासमक्ष 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ( ACB ) कडे तक्रार केली. यावरून लाचलुचपत विभागाने सापळा लावून 1 हजार 500 ( दीड हजार रुपये ) लाच स्वीकारताना कृष्णा महादेव आगलावे यास रंगेहाथ पकडले. दुसरी कारवाई वडवणी तालुक्यातील असून ढोरवाडी ग्रामपंचायत ( ता.वडवणी ) याने तक्रारदाराला शेतात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर मंजुर करण्यासाठी ठराव घेऊन फाईल तयार करण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली. 10 हजार लाच स्वीकारताना सदरील ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला. वसंत बळवंतराव जांभळे असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. हे सापळे बीड व उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी केले.