बीडमधील खळबळजनक घटना! मावसभावाने घातली छातीत गोळी
जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी घातक शस्त्रे पुरवणाऱ्यांचे पाळेमुळे शोधण्याची गरज

लोकगर्जनान्यूज
बीड : वादातून चक्क मावसभावाने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शहरात रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गोळी लागून एकजण गंभीर जखमी झाला. मागील काही दिवसांपासून पिस्तूल, तलवारी असे घातक शस्त्रे आढळून येत असून ही शस्त्रे पुरवणारी मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याचे दिसून येत असल्याने शांतता अबाधित राखण्यासाठी या टोळीचे पाळेमुळे शोधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गोळीबार घटनेतील जखमी मनोज दत्ताराव जाधव रा. पात्रुडगल्ली माळीवेस,बीड याचे अन् नात्याने मावसभाऊ असलेल्या तरुणाचा रविवारी रात्री ( दि. १ ) साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाद सुरू झाला. याचे कारण स्पष्ट नसले तरी क्षुल्लक कारण असल्याचे सांगितले जात आहे. या वादाचे रुपांतर चक्क गोळीबारात झाले. मामाच्या मुलाने चक्क जवळचा पिस्तूल काढून गोळीबार केला. ती गोळी जाधव यांना लागून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. सदरील गोळी छातीवर लागल्याचे वृत्त आहे. यानंतर गोळी झाडणाऱ्या आरोपींना घटनास्थळावरून पळ काढला आहे. जखमी जाधव मनोज यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी असे घातक शस्त्रे आढळून येत असल्याचे पोलीस कारवाईतून उघड झाले आहे. यामुळे जिल्ह्यात घातक शस्त्रे पुरविणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.