पावसाची दडी सोयाबीनसह विविध पिके करपली: शेतकरी हवालदिल
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे मागील २० ते २२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी सोयाबीनसह विविध पिके करपून गेली असून हातातोंडाशी आलेला घास जातो की, काय? म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता पाऊस झाला तरीही उत्पादनं घट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने संपले आहेत. या तीन महिन्यांत आडस परिसरात एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे या भागातील नदीनाले अद्याप कोरडे आहेत. सुरवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकून घेतली यानंतर पावसाची रिमझिम सुरू असल्याने पिकं जोमात आली. या भागात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झालेली आहे. त्यामुळे हे प्रमुख पीक ठरले असून, यावर शेतकऱ्यांची वर्षभराची मदार आहे. परंतु मागील २० ते २२ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगा भरण्याचा काळ आहे. याच काळात पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार यात शंका नाही. पावसाविणा पिके सुकत असल्याने अनेकांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. शेती पंप सुरू होताच विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचं रान करताना दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही तसेच हलकी जमीन असलेल्या ठिकाणची पीके पुर्णपणे पिवळी पडून करपून गेली आहे. आता पाऊस झाला तरीही हे नुकसान भरुन निघणार नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आमदार मुंदडांची मागणी
केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके जळून गेली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.