निवडणूकीच्या धामधुमीत कापूस ४०० रु. प्रतिक्विंटल घसरला
तरुणांनो तुमच्या शिक्षण अन् सळसळत्या रक्तात याचा जाब विचारायची हिंमत आहे का?
लोकगर्जनान्यूज
बीड : लोकसभेची निवडणूक सुरू असून, तरुण आपल्या नेत्याचा जयजयकार प्रचारात गुंतला आहे. परंतु शेतमालाचे भाव पडत असल्याने दुसरीकडे बाप कंगाल होत आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मागील १५ दिवसांमध्ये कापूस प्रतिक्विंटल ४०० रु. ने घसरला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबतीत आजचा सुशिक्षित असलेला तरुणात याचा जाब विचारण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निवडणूक म्हटले की, तरुणाशिवाय पुढाऱ्यांच पानही हलत नाही. निवडणूकीच्या काळात १५ ते २० दिवस त्याची प्रत्येक इच्छा नेत्यांकडून पुर्ण होतात. या मोबदल्यात तरुण हातात झेंडा घेऊन बापाने सांगितलेले कामाला फाट्यावर मारुन आपल्या लाडक्या दादा, साहेब, ताई , भैय्या यांच्या मागे जयजयकार करत प्रचारात दंग होऊन जातो. सध्या हेच चित्र आपण अनुभवतो आहोत. पोरगा जयजयकार करत असताना मात्र दुसरीकडे बापाने मेहनत केलेल्या कापसाची माती झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी कापूस ७ हजार ९५० रु. प्रतिक्विंटल पर्यंत पोचला होता. यामागील वाढती मागणी आणि उत्पादन कमी असल्याने कापूस दरवाढ होत असल्याचे सांगण्यात आले. परंतु पंधरा दिवसात नेमकं उत्पादन वाढलं की, मागणी घटली काहीच समजत नाही. परंतु ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कापूस प्रतिक्विंटल तब्बल ४०० रु. घसरले आहे. ७ हजार ९५० प्रतिक्विंटल दराने घेतला जाणार कापूस आज ७ हजार ५५१ ते ७ हजार ५५६ रु. घेतला जातो आहे. हा एक नंबर कापसाचा भाव आहे. जर यात फडतर असेलतर तो ६ हजार ५०० पर्यंत दर आहे. दरवाढ सुरू असल्याने आणखी वाढ होईल अन् कापूस विकता येईल चार पैसे जास्त मिळतील या विचाराने शेतकरी काहीसा आनंदी होता. परंतु अचानक भाव घसरण्यास सुरवात झाली अन् पहाता-पहाता ८ हजारांच्या घरात पोचलेले कापूस साडेसात हजारावर गेले असल्याने पुन्हा कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. याबाबत सध्या कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. बरं कोणी बोलो अथवा न बोलो आपला बाप देशोधडीला लागत असून, त्यांने आजपर्यंत आपल्याला जागविले असून पुढेही तोच जगविणार आहे. त्यांच्या शेत मालाचे भाव का पडलें? याचा जाब शेतकऱ्याचा मुलगा विचारणार आहे का? असा प्रश्न आहे. मग तो सत्ताधारी असो की, विरोधक यांना तुम्ही शेतमालाच्या बाजारभाव बाबतीत काय केले? हे विचारणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.