नाल्यात वाहून गेलेल्या गेवराई येथील बालकाचा शोध सुरूच
लोकगर्जना न्यूज
गेवराई : येथील बालवाडीतून परत येणारा तीन वर्षांचा बालक पाय घसरून नाल्यात पडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी ( दि. २६ ) दुपारी घडली आहे. कालपासून सदरील बालकाचा शोध घेण्यात येत असून अद्याप ही तो न सापडल्याने शोध सुरू आहे. आज प्रशासनासह अनेक तरुण शोध कार्यात उतरले असून, विद्रुपा नदीत शोध कार्य सुरू आहे.
सोमवारी ( दि. २६ ) गेवराई येथे जोरदार पाऊस झाला. दुपारी बालवाडी सुटल्यानंतर बंटी ज्ञानेश्वर क्षीरसागर ( वय ३ वर्ष ) हा घरी परत जाताना त्याचा पाय घसरून चिंतेश्वर गल्लीतील नाल्यात पडला. पावसामुळे पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला. ही घटना समजताच गेवराई करांना धक्का बसला आहे. काल पासून तालुका प्रशासन या बालकाचा शोध घेत आहे. आज शोध मोहीम जोरदार सुरू झाली असून, पोलीस, नगर परिषद कर्मचारी यांच्या सह शेकडो तरुण येथील विद्रुपा नदीत उतरून शोध घेत आहेत. मात्र बालकाला शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. तहसीलदार, पोलीस अधिकारी सह तालुका प्रशासन तळ ठोकून आहे. या घटनेने गेवराईकर सुन्न झाले असून प्रत्येक जण तो मिळावा अशी भावना व्यक्त करत हळहळ व्यक्त करत आहे.