धुळे नंतर बीड जिल्ह्यातही पोलीसांकडून तलवारी जप्त
लोकगर्जना न्यूज
परळी येथील संभाजीनगर पोलीसांना शहरात एक व्यक्ती बेकायदेशीर तलवारी बनवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सदरील ठिकाणी छापा मारला असता पोलीसांनी ४ तलवारी, १ खंजीर व तलवारी बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. या प्रकरणी सदरील व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
संभाजीनगर पोलीसांना गुप्त खबऱ्याने माहिती दिली की, शहरातील फुले नगर भागातील सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी हा तलवारी बनवून बेकायदेशीररीत्या विक्री करत आहे. या माहितीवरून संभाजीनगर पोलीसांनी ( दि. २९ ) १२ वाजण्याच्या सुमारास छापा मारुन घराची झडती घेतली असता घरामध्ये ४ तलवारी, १ खंजीर, तलवारी बनविण्यासाठी लागणारे साहित्य ग्रॅंडर, लोखंडी पट्टा, एक्साब्लेड असे ४ हजार ७५० रु. मुद्देमाल मिळून आला. दोन पंचासमक्ष पंचनामा करून आरोपी व मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी सपोनि ठाकुर यांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाणे परळी येथे आरोपी सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोउपनि मेंढके हे करीत आहेत.