जवळबन,आडस येथील शेतकऱ्यांच्या रेशीमला मिळाला प्रतिकिलो ८३५ रु. विक्रमी दर

रेशीम शेतीने अनेकांचे जगणे केले मुलायम
लोकगर्जना न्यूज
रेशीम कोषला मागील काही महिन्यांपासून चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सोमवारी ( दि. २८ ) जवळबन, आडस येथील शेतकऱ्यांना ८३५ ते ८२९ प्रतिकिलो असा विक्रमी दर मिळाला आहे. जवळपास प्रत्येकाला ७०० रु. पुढे प्रतिकिलो असाच दर मिळत असल्याने रेशीम शेतीने अनेकांचे जगणे मुलायम केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आडस परिसरात मोठी नदी नाही त्यामुळे तलाव ही नसल्याने येथील शेतीसाठी पाण्याची शाश्वत असी सोय नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. ऊस लागवडीचा प्रश्नच येत नाही ज्यांना नशीबाने विहीर, बोअरला मुबलक पाणी लागले तेच तुरळक शेतकरी ऊस लागवड करतात. इतर शेतकरी कापूस, सोयाबीन,तूर, हरबरा अशीच पारंपरिक पिके घेऊन शेती करत आहेत. परंतु कापसाला आता उतार येत नसून सोयाबीन घेतलीतर पावसाच्या लहरीपणामुळे पदरात पडेपर्यंत त्याची शाश्वती नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नसल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तुती लागवड ही शाश्वत उत्पन्न देणारी ठरत असल्याने येथील अनेक शेतकरी रेशीम उत्पादनाकडे वळले आहेत. आज मितीला आडस येथे २० च्या जवळपास शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून ते नियमित रेशीम शेती करत आहेत. रेशीम शेती ही नोकरी प्रमाणे प्रत्येक महिन्याला उत्पन्न देणारे वाण आहे. तसेच याला दरही इतर पिकांच्या तुलनेत भरघोस असा असून, ५०० ते ६०० प्रतिकिलो असे स्थिर दर असतात. अपवाद वगळता यापेक्षा खाली रेशीम कोषचे दर येत नाहीत. मागील काही महिन्यांपासून तर कोषला विक्रमी असे दर मिळत आहेत. यापुर्वीही आडस व परिसरातील काही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना डिसेंबर २०२१ मध्ये ७९८ ते ७५० असा प्रतिकिलो दर मिळाला आहे. तो दर सर्वाधिक होता. परंतु हा विक्रमही सोमवारी ( दि. २८ ) फेब्रुवारी २०२२ मोडला आहे. आडस,जवळब, कळमअंबा, लाडेवडगाव,जानेगाव, कोद्री येथील रेशीम उत्पादक शेतकरी कोष विक्रीसाठी रामनगर ( कर्नाटक ) येथे गेले होते. यावेळी रविंद्र जयराम गायकवाड रा. जवळबन ( ता. केज ) दर ८३५, मुरली काळे ८३३, शेख मुसा ८२९ रु. असा विक्रमी दर मिळाला आहे. हा आजपर्यंतचा विक्रमी असा दर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच यांच्या सोबत असलेले श्रीधर हरीभाऊ लाड रा. लाडेवडगाव ( ता. केज ) दर ७६५, राजेंद्र शिवाजी सावंत रा. कळमअंबा ( ता. केज ) दर ७७५, माऊली ढाणे रा. कोद्री ( ता. अंबाजोगाई ) दर ८११, युवराज काशिनाथ शिंदे रा. जानेगाव ( ता. केज ) दर ७८५, गोविंद करपे रा. जवळबन ( ता. केज ) दर ८१५, असे दर मिळाले आहे. दिवसेंदिवस रेशीम कोषचे दर वाढत असल्याने तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच दर्जेदार रेशीम कोष काढून ८३५ ते ८२९ असा विक्रमी दर घेतल्यामुळे शेख मुसा, मुरली काळे, रविंद्र गायकवाड यांचे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.