धारुर तालुक्यातील शेतकरी आक्रमक दुष्काळ प्रश्नी सोमवारी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
या रस्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - इंज. सादेक इनामदार
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप पिके जळून गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुर्ण तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करुन ५० टक्के अग्रीम देण्याची मागणी केली. या सह आदि मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोमवारी ( दि. ४ ) सकाळी १०:३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या रस्ता रोको आंदोलन धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन इंजिनिअर सादेक इनामदार यांनी केले.
धारुर हा तालुका डोंगराळ भागाचा असून येथील शेती केवळ खरीप हंगामात केली जाते. यानंतर या भागातील बहुतांश शेतकरी ऊसतोडणीसाठी राज्यात व राज्याबाहेर जातात. तसेच डोंगराळ तालुका असल्याने येथील मातीची पाणी साठवूनक क्षमता अत्यंत कमी असल्याचे माती परीक्षणातून सिद्ध झाले आहे. यावर्षी तर अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली. आजही पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचे ७० टक्के नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पुर्ण धारुर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के अग्रीम देण्यात यावे, पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तात्काळ अनुदान देण्यात यावे. या मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी ( दि. १ ) तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पोलीस प्रशासनाला दिले आहे. या मागण्या मान्य नाही झाल्यातर सोमवारी ( दि. ४ ) सकाळी १०:३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. सदरील निवेदनावर इंजिनिअर सादेक इनामदार, बालाजी चव्हाण, सचिन थोरात, किशोर थोरात, लहु फुटाणे, प्रकाश सोळंके, संदीप शिनगारे यांच्या सह धारुर, अंजनडोह, पांगरी, चोरंबा आदि शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – इंज. सादेक इनामदार
तालुक्यातील भीषण परिस्थिती पाहता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हक्काच्या विम्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते इंज. सादेक इनामदार यांनी केले.