आपला जिल्हा

दिलासादायक बातमी;कोरोना सौम्य होतोय का? तुरळक रुग्ण ॲडमिट अनेकांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू

 

लोकगर्जना न्यूज

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासनासह जनतेतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण वाढत असलेतरी समाधानाची एक बाब आहे की, तुरळक रुग्णांना दवाखान्यात ॲडमिट करण्याची गरज पडत असून बहुतांश रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. घरीच उपचार घेऊन रुग्ण बरे होत असून सध्या एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. त्यामुळे कोरोना सौम्य होतोय का? असे म्हटले जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. तीव्रता जास्त असल्याने जवळपास प्रत्येक रुग्णाला दवाखान्यात ॲडमिट करण्याची गरज भासत होती. त्यामुळे रूग्णांना बेड मिळणं मुश्किल झाले होते. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोनाची दहशत होती. तसेच ऑक्सिजनचीही मोठी गरज भासत असल्याने तुटवडा निर्माण झाला होता. परंतु शासन व प्रशासन, डॉक्टर,नर्स, ब्रदर असो की, स्वच्छता कृमचारी यांनी रात्रीचा दिवस केला. कोरोना रुग्णांना बरे केले. इतकी मेहनत घेऊनही अनेकांना कोरोनाने हिरावून नेले. यानंतर दुसरी लाट ओसरत गेली व बऱ्या पैकी म्हणजे जिल्ह्यात काही वेळा बाधितांचा आकडा एक अंकावर आला. आता सर्व काही सुरळीत होत आहे असे वाटत असतानाच ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. पहाता पहाता भारतात, महाराष्ट्र, मराठवाडा असा सर्वत्रच पसरला. बाहेर देशातील ओमिक्रॉनची वाढत्या गतीमुळे चिंतेचे वातावरण पसरले. यानंतर मुंबई अन् राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढ सुरू झाली. याला बीड जिल्हा ही अपवाद ठरला नाही. एक अंकावर आलेली कोरोना बाधितांची संख्या ३०० वर पोहोचली अन् चिंतेचे वातावरण निर्माण झाले. वाढती रुग्ण संख्या पहाता व दुसऱ्या लाटेत मोजावी लागलेली किंमत याचा विचार करुन सोमवार ( दि. २४ ) शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेऊनही जिल्हाधिकारी यांनी केवळ १० ते १२ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्व यंत्रणा सतर्क झाली. परंतु आज एक समाधान कारक बातमी समोर आली. बीड रिपोर्टरच्या आजच्या वृत्ता नुसार रविवार (दि. २३ ) पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे १ हजार ५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील केवळ १२१ रुग्ण दवाखान्यात दाखल करण्याची गरज भासली आहे. यामध्ये बीड येथे जिल्हा रुग्णालयात १० तर अंबाजोगाई येथे १५ आणि इतर जिल्ह्यांतील इतर दवाखान्यात दाखल आहेत. तब्बल १ हजार ४२६ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज भासली नाही. जे दवाखान्यात आहेत त्यातील एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. हे चित्र पहाता रुग्ण वाढत असलेतरी ते सर्व सौम्य आहेत? ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. परंतु नागरिकांनी कोरोना बाबतीत गंभीर होण्याची गरज असून भीती न बाळगता दक्षता घेणं गरजेचं आहे. कोविड बाबतीत असलेले शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे असे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »