धक्कादायक ! बीड जिल्ह्यात भरदिवसा रोड रॉबरी;पाळत ठेवून लाखोंची रक्कम लुटली

लोकगर्जना न्यूज
माजलगाव : येथील एका बँकेतून साडेतीन लाख रुपये काढून ते पिशवीत ठेऊन दुचाकीवर जाताना पाळत ठेऊन असलेल्या तीघांनी डोळ्यात मिर्ची पावडर टाकून जबर मारहाण करुन लुटून नेले. सदरील घटना आज दुपारी खामगाव-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव ते पात्रुड दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासात करीत आहेत. भरदिवसा लुटीचा घटना अन् तेही मोठी आहे रहदारी असलेल्या रस्त्यावर घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनार्दन कोळसे व गजानन कोळसे रा. लोनगाव ( ता.माजलगाव ) हे दोघे भाऊ असून, त्यांचे कारखान्याला दिलेल्या ऊसाचे बील माजलगाव येथील पुर्णवादी बँकेच्या शाखेत जमा झाले. ती रक्कम घेऊन जाण्यासाठी ते दोघे माजलगाव येथे आले. बँकेतून सव्वा तीन अथवा साडेतीन लाखांची रक्कम काढली. रक्कम एका पिशवीत भरून दुचाकीवरुन परत आपल्या गावी लोनगावकडे चालले होते. दरम्यान माजलगाव व पात्रुडच्या मधील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कॅनल जवळ आले असता यांच्यावर पाळत ठेवून असलेले तिघे पाठी मागून दुचाकीवर आले. काही समजण्याच्या आधीच त्यांनी या दोघा भावांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून पिशवी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याही अवस्थेत ते पिशवी सोडत नाही हे पाहून जबर मारहाण केली. लाखोंची रक्कम आसलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळ काढला. याप्रकरणी माजलगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भरदिवसा व मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर रोड रॉबरीची घटना घडल्याने उघडकीस येताच खळबळ माजली आहे. हे चोरट्यांचे पोलीस प्रशासनास एकप्रकारे आव्हान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. एवढा मोठा प्रकार घडत असताना व मारहाण करण्यात येत असताना कोणीही मदतीला धावला कसा नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.