थरार-पाठलाग करुन दोन वाहने चोरण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न हाणून पाडला
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे रात्री दोन वाहने चोरण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. एक वाहन पाठलाग करुन चोरट्यांच्या तावडीतून सोडविला असून एक कपड्यांचे दुकान फोडण्यात आले. घटनेची माहिती दिल्यानंतर धारुर पोलीसांनी गावात राऊंड मारलं. या घटनेने आडस येथे भीती निर्माण झाली आहे.
आडस येथील एकता नगरला वीजपुरवठा करणारे रोहित जळालेले असल्याने मागील जवळपास १० दिवसांपासून आंधार आहे. याच आंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी एकता नगर भागात गुरुवारी ( दि. ८ ) मध्यरात्री जवळपास अडीचच्या सुमारास धुमाकूळ घातला. प्रथम येथील केशव खाडे यांचे कपड्यांचे दुकान फोडण्यात आले. यामध्ये काहीच रोख रक्कम हाती लागली नाही. यानंतर चोरट्यांनी वाहनाकडे मोर्चा वळवला आठवडी बाजारात किराणा विक्रीचा व्यवसाय करणारे बापू म्हेत्रे यांचे टाटा एस ( छोटा हत्ती ) किराणा मालासह चोरटे घेऊन पसार झाले. पण वाहन चालु झाल्याचे ऐकू आल्याने ते बाहेर आले असता काहीजण बाजुला उभे असलेले पिकअप सुरु करण्याचा प्रयत्न करत होते अन् त्यांचे वाहन गायब दिसल्याने त्यांनी चोर आल्याचे सांगत आरडाओरडा सुरू केली. आरडाओरडा ऐकून सर्व शेजारी धावत आल्याने चोरटे पसार झाले. तर पळविलेल्या वाहनाचा ग्रामस्थांनी पाठलाग सुरू केला. जवळपास एक किलोमीटरवर सदरील वाहन चोरटे सोडून रानातून पसार झाले. अशा तऱ्हेने ग्रामस्थांनी जागरुकता बाळगून चोरी होणारे दोन्ही वाहने वाचवली. घटनेची माहिती धारुर पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलीसांनी गावात एक फेरी मारली. बापु विश्वनाथ म्हेत्रे,संभाजी खाडे, केशव खाडे,आणा खाडे, वसंत खाडे तुशार खाडे उमेश खाडे, बापू म्हेत्रे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. सतत आडस येथे चोरीच्या घटना घडत असतानाही रात्रीची येथे गस्त सुरू नसते. येथे पोलीस दूरक्षेत्र ( चौकी ) आहे परंतु येथे केवळ दोनच कर्मचारी नियुक्त असतात. नियमानुसार ये एक अधिकारी व सात कर्मचारी असणं आवश्यक आहे. दोन कर्मचारी असल्याने ते कोणतेही काम करु शकत नाही. यामुळे येथे कर्मचारी वाढवून रात्रीची गस्त सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.