तीन लाख देऊन नवरी आणली अन् दोनच महिन्यात भूर झाली
लोकगर्जनान्यूज
बीड : वय ३४ झालं पण मुलगी मिळत नसल्यामुळे लग्न होईना, हीच संधी साधून एका ओळखीच्या महिलेने मुलगी दाखवली अन् लग्नासाठी तीन लाखांची मागणी केली. तरुणाने लग्न होतं असल्याने तीन लाख दिले. लग्न ही झाले पण दोन महिन्यातच नवरी भूर झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीसात धाव घेतली असून नवरी, इतर दोन महिला, एक पुरुष असे चौघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चिखली ( ता. आष्टी ) येथील एका ३४ वर्षाच्या तरुणाचे लग्न होतं नव्हतं यादरम्यान एका महिलेने मध्यस्थी करून एक स्थळ आणले मुलगी पहाण्याचा कार्यक्रम पार पडला,मुलगीही तरुणाला पसंत पडली. यानंतर मुलाकडे लग्न करण्यासाठी ३ लाखांची मागणी करण्यात आली. तीन लाख देऊन नोव्हेंबर महिन्यात रितीरिवाज प्रमाणे लग्न झाले. मुलगी नांदण्यासाठी आली. जानेवारी महिन्यात ती माहेरी गेली. पण परत काही आली नाही. यानंतर नवरी मुलीला फोन करुन येण्यासाठी सांगितले तर विविध कारणे देऊन सासरी येण्याचे टाळू लागली. काही दिवसांनंतर फोनही बंद झाला. कोणाचाही संपर्क होत नाही. यावरून तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन आष्टी पोलीस ठाण्यात नवरी, नवरीची बहीण, बहीणीचा पती अन् मध्यस्थी महिला असं चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सपोनि विक्रांत हिंगे हे करत आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. लग्नाचे वय निघून जात असल्याने मुलांचे नातेवाईक मिळेल ते स्थळ स्वीकारुन लग्न उरकून घेत आहेत. परंतु मागील काही वर्षांपासून यातही फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे उपवर मुले दोन्ही बाजुंनी संकटात सापडले आहेत.