गाडीला जुंपलेले बैल उधळले अन् … धारुर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : बैलगाडी सह शेतकऱ्याने बैलांना पाणी पाजण्यासाठी तलावावर जाताना अचानक रानडुकरांनी हल्ला केल्याने बुजल्यामुळे ( भीले ) उधळत तलावात गेले. यावेळी बैलगाडीत बसलेले आजोबा व नातू पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना कासारी ( बो. ) ( ता. धारुर ) येथे आज गुरुवारी ( दि. २२ ) दुपारी घडली आहे. दुसरा नातू तलावाच्या काठावर पडल्याने तो जखमी आहे.
सय्यद कबीर बाशुमियां ( वय ६५ वर्ष ), सय्यद अमजद अखिल ( वय १२ वर्ष ) दोघे रा. कासारी बो. ( ता. धारुर ) असे मयत आजोबा व नातूचे नाव आहे तर जखमी नातवाचे सय्यद अतिख ( वय १५ वर्ष ) असे नाव आहे. आजोबा व दोन नातू असे तिघे बैलगाडीतून चालले होते. यावेळी गावाच्या लगत असलेल्या तलावावर जनावरांना पाणी पिण्यासाठी नेलं. तलावाच्या काठावर पाणी पिताना बैलांवर अचानक रानडुक्करनी हल्ला केल्याने बैल भीले अन् उधळत गाडीसह तलावात घुसले. यावेळी आतील आजोबा आणि नातूही पाण्यात ओढले गेले. यामुळे आजोबा सय्यद कबीर आणि एक नातू अमजद या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अतिख अलिकडेच गाडीतून फेकला गेल्याने तो पडला परंतु तोही जखमी असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटना समजताच गावातील नागरिकांनी तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले आहे. जखमीलाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून धारुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.