‘ते’ पाचही शिक्षक निलंबित; सीईओ अजित पवारांची कारवाई

बीड : काही दिवसांपूर्वी बीड शहराजवळ एका व्हीआयपी पत्त्याच्या क्लबवर एएसपी पंकज कुमावत यांनी छापा मारला. यामध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्याच नाव आल्याने ही कारवाई चांगलीच गाजली. येथे सापडलेल्या जुगाऱ्यांमध्ये पाच शिक्षकांचाही समावेश असल्याचे समोर आलं होतं. त्याची माहिती मागवून बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी गुरुवारी निलंबनाची कारवाई केली. जुगार खेळणे या मास्तरांच्या चांगलेच अंगलट आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शिक्षक भगवान आश्रुबा पवार ( रा.काळेगाव हवेली ता . बीड ) , हरिदास जनार्धन घोगरे ( रा.नंदनवन कॉलनी बीड ) भास्कर विठ्ठल जायभाय ( रा . काकडहिरा ता.पाटोदा ) , अशोक रामचंद्र सानप ( रा.कालिकानगर बीड ) , बंडू किसन काळे ( रा . कालिकानगर बीड ) असे निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत . एएसपी पंकज कुमावत यांनी तळेगाव परिसरात एका व्हीआयपी क्लबवर छापा टाकून जवळपास ५० जुगाऱ्यांना ताब्यात घेतले . ५१ जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . यामध्ये पाच शिक्षकांचा समावेश असल्याचं समोर आले. यातील दोघे जिल्ह्यातील शिक्षकांचं नेतृत्व करत असून दोघांकडे ही वेगवेगळ्या शिक्षक संघटनांच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा असल्याचे सांगितले जात आहे. याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत जुगारी मास्तरांची माहिती बीड ग्रामीण पोलीसांकडून घेऊन ती माहिती पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली. त्यानंतर सीईओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली .