कौतुकास्पद:रुई धारुर येथील शेतकऱ्याचा मुलगा होणार पोलीस उपनिरीक्षक
लोकगर्जना न्यूज
धारुर तालुक्यातील रुई धारुर येथील सतीश तिडके या सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने एमपीएससी स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्याचे पोलीस उपनिरीक्षक ( पीएसआय ) होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. शेतकरी कुटुंबातील तरुण पोलीस उपनिरीक्षक होणार असल्याने त्याचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या वतीने अंबा साखरचे चेअरमन रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप मारत शुभेच्छा दिल्या.
रुई येथील शिवाजी तिडके हे शेतकरी असून त्यांना वडिलोपार्जित ८-१० एक्कर शेती आहे. ही शेती असून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बाबतीत कोणाला सांगण्याची गरज नाही. परंतु आपल्या मुलांनी शिकावं ते अधिकारी व्हावे असे स्वप्न पाहिले. त्यामुळे सतीश यास प्राथमिक शिक्षणा पासून अंबाजोगाई येथे खोलेश्वर विद्यालयात टाकलं येथेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण झाले. यानंतर सतीश यांनी नागपूर येथे बीएससी ॲग्री हे पदवीचे शिक्षण पुर्ण केले. अधिकारी होण्याचे वडीलांचे स्वतः चे स्वप्न होते . ते पुर्ण करण्यासाठी पदवीच्या शिक्षणानंतर पुणे येथे राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( एमपीएससी ) स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. यासाठी विशेष मार्गदर्शन क्लासेस लावले व स्वतः ची मेहनत करत. २०१९ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परिक्षेची पीएसआय पदाची गुणवत्ता यादी ( दि. ७ ) मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सतीश शिवाजी तिडके यांनी यश संपादन करत उत्तीर्ण झाले आहे. ही बातमी गावात व कुटुंबाला समजताच त्यांचं आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गावातील तरूण पीएसआय ( पोलीस उपनिरीक्षक ) होणार म्हणून आनंद साजरा करण्यात आला. तर एमपीएससी पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सतीश व कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे. गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळावी म्हणून बुधवारी ( दि. ९ ) गावकऱ्यांच्या वतीने सायंकाळी ७ वाजता सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सत्कार करुन सतीश तीडके यांच्या पाठीवर गावकऱ्यांनी शाब्बासकीची थाप मारून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सतीश यांच्यावर नातेवाईक, मित्र परिवार आदि सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.