केज तालुक्यात पेट्रोल पंप चालकांची चोरट्यांनी झोप उडविली; एकाच रात्री दोन पंपावरील 4 लाख चोरले
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील युसूफवडगाव आणि बोरीसावरगाव येथील दोन पेट्रोल पंपावर मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून 4 लाख रोख रक्कम करून दुचाकी वरुन पसार झाले . या चोरी झालेल्या दोन्ही पेट्रोल पंपाचे अंतर १५ कि.मी. असून केवळ २५ मिनिटाच्या फरकाने चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी चोरी केली.
शुक्रवारी ( दि. 16 ) रात्री साडे अकराच्या सुमारास युसुफवडगाव येथील शिवरुद्र चोपणे यांच्या शुभम पेट्रोलियम सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी पंपाच्या कार्यालयाचा काचेचा दरवाजा फोडून मॅनेजरला कुकरी या धारदार शस्त्राचा धाक दाखवून हल्ल्यातील रोख रक्कम अन् वाहनात इंधन भरीत असलेल्या कामगारांच्या खिशातील रोख रक्कम असे एकूण 25 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन दुचाकीवरुन अंबाजोगाईच्या दिशेने पळून गेले. जाताना याच रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावरील बोरीसावरगाव येथील विश्वनाथ सोमवंशी यांच्या सोमवंशी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाच्या दरवाजाचा काच फोडून मॅनेजरला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दिवसभरात इंधन विकून आलेली रोकड 3 लाख 70 हजार चोरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एकाच रात्री दोन पेट्रोल पंपावर धाडसी चोरीची घटना घडल्याने पंप चालकांची झोप उडाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.