केज तालुक्यातील एकाचे अपहरण: चौघा विरुद्ध गुन्हा दाखल
केज : तालुक्यातील ढाकेफळ येथील एका व्यक्तीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून त्याचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहृत व्यक्तीच्या पत्नीने तक्रारी केली. त्यावरून चौघा विरुद्ध अपहरण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदरील प्रकार ऊसतोडीसाठी मजुर पाठवतो म्हणून पैसे घेऊन ही मजुर न पाठविल्याने घडलं आहे.
पांडुरंग घाडगे असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ( दि. २८ ) शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ढाकेफळ ता. केज येथे उदय पाटील, स्वप्नील पाटील आणि इतर दोन साथीदार यांनी पांडुरंग घाडगे यांना ऊस तोडणीसाठी पाच लाख रु. घेऊनही मजूर का पाठविले नाही? असे म्हणून लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच पैसे का दिले नाही? म्हणून लाने गच्चीला पकडून खाली पाडले. स्वप्नील पाटील याने जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. पांडुरंग घाडगे यांना गाडीत घालून अपहरण केले. जो पर्यंत पैसे देत नाही; तो पर्यंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
पाच लाख रु. साठी अपहरण करण्यात आलेले पांडुरंग घाडगे यांची पत्नी सौ. मैनाबाई घाडगे यांनी ( दि. २९ ) जानेवारी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात पतीचे अपहरण केल्याची तक्रार दिली.
त्यावरून उदय पाटील, स्वप्नील पाटील दोघे रा. कावणे ता. करवीर जि. कोल्हापूर आणि इतर दोघे असे चार जणांच्या विरुद्ध गु.र.नं. २१/२०२२ भा.दं.वि. ३६५, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जातीजमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा ३ (१)(आर)(एस) नुसार अपहरण, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी व ॲट्रॉसिटी या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.