कालच्या रोड रॉबरीचा पर्दाफाश; तपासातून समोर आलेल्या कारणाने चक्रावून जाल
पंकज कुमावत व रश्मीता राव यांनी काही तासातच लावला छडा
लोकगर्जना न्यूज
माजलगाव-पात्रुड दरम्यान कॅनल जवळ काल दिवसाढवळ्या रोड रॉबरीची घटना उघडकीस आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. परंतु अशी काही घटनाच घडली नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. दोघा भावांनी रोड रॉबरीचा बनाव केला. त्यामुळे पोलीसांनी सुटकेचा निःश्वास सोडला तर फिर्यादी असलेल्या त्या दोघा भावांना आता पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
ऊसाचं आलेलं बील उचलून नेताना लोनगाव ( ता. माजलगाव ) येथील जनार्दन कोळसे व गजानन कोळसे या दोघा भावांना पाठी मागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी डोळ्यात मिर्ची पावडर टाकून व मारहाण करुन साडेतीन लाख रुपये लुटल्याचे पोलीसांना सांगितले होते. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही तपासले, त्या आधारे तपास सुरू करुन अनेकांची चौकशी केली. यामध्ये फिर्यादी असलेले दोघा भावांनी हा बनाव केल्याचं निष्पन्न झाले. जनार्दन कोळसे व गजानन कोळसे यांची उलट तपासणी केली असता कर्ज घेतलेले पैसे परत द्यावे लागतील म्हणून आम्हीच पैसे चोरुन नेल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. काही तसातच एएसपी पंकज कुमावत आणि माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी आयपीएस रश्मीता राव यांनी घटनेचा छडा लावला. या रोड रॉबरीचे कारण समोर आल्याने सर्वच चक्रावून गेले.