कर्तव्य बजावताना काळाची झडप:करंट लागून लाईनमनचा मृत्यू
ऐन दिवाळीतच घटना घडल्याने अंबाजोगाई शहर हळहळले
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : वीजपुरवठा खंडित झाल्याने ती पूर्ववत सुरू करण्यासाठी खांबावर चढलेल्या लाईनमनला करंट लागून मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई शहरात रविवारी ( दि. २३ ) सायंकाळी घडली. ऐन दिवाळी या आनंदाच्या क्षणी ही दुर्दैवी घटना घडल्याने अंबाजोगाई शहर हळहळले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
मेघराज व्यंकटी चाटे ( वय २८ वर्ष ) रा. वरवटी ( ता. अंबाजोगाई ) असे मयताचे नाव असून ते अंबाजोगाई येथे महावितरण कंपनीमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत होते. रविवारी ( दि. २३ ) दिवाळी असल्याने या प्रकाशाच्या सणात कोणाच्याही घरात अंधार होऊ नये म्हणून महावितरणचे कर्मचारी सेवा बजावतात. मेघराज चाटे ही सेवेवर होते. यावेळी स्वाराती रुग्णालयात रस्त्यावरील तलावा जवळ विद्युत बिघाड झाला. यावेळी तो बिघाड दुरुस्त करून क्रांती नगरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मेघराज चाटे आले. वीजपुरवठा बंदही करण्यात आला. ते पोलवर चढून कामासाठी तारेला हात लावताच वीजेचा जोरदार धक्का लागला ते बेशुद्ध झाले. हा प्रकार लक्षात येताच वीजपुरवठा बंद करुन तातडीने खाली उतरून घेऊन दवाखान्यात नेले परंतु डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुटुंबाला मोठा धक्का आहे. दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले असून अंगाची हळद ही निघाली नाही तर हा आघात झाल्याने गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.