आपला जिल्हा

आमचं गाव आमचा विकास कार्यशाळेला ग्रा. पं. सदस्य व ग्रामसेवकांची दांडी

कागदोपत्रीचा डाव शिवरूद्र आकुसकर यांनी उधळून लावल्याने उद्या होणार कार्यशाळा

लोकगर्जना न्यूज

केज : आज तालुक्यातील सर्व पंचायत समितीच्या गणातील ग्रामपंचायत सदस्यांसाठी”आमचं गाव आमचा विकास” एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला आडस गणातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी दांडी मारल्यामुळे न झालेली कार्यशाळा कागदोपत्री दाखवण्याचा प्रशिक्षकाचा डाव आडस ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी उधळून लावला. गटविकास अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्याने त्यांनी उद्या गुरुवारी कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले. पण उद्या तरी कोणी येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद बीड, पंचायत समिती,केज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रम अंतर्गत “आमचं गाव आमचा विकास” ग्रामपंचायत विकास आराखडा संबधिचे गणातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंसाधन गट यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे तालुक्यातील सर्व पंचायत समिती गाणात आयोजन केले होते. आडस गणातील आडस,कळमअंबा,बनकरंजा, उंदरी, केकतसारणी, जानेगाव, केकाणवाडी या ग्रामपंचायत सदस्यांसाठी आडस ग्रामपंचायत कार्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती. परंतु दुपारचं १ वाजलं तरी येथे केवळ एक प्रशिक्षक, आडसचे ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, एक ग्रामपंचायत सदस्य असे ५ जण उपस्थित होते. गणातील इतर कोणताही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी पाठ फिरवल्यामुळे कार्यशाळा झालीच नाही. वर्षभराचा गावाचा विकास आराखडा याबाबत ही कार्यशाळा असते परंतु याबाबत कोणालाही अस्था नाही असे यातून दिसून आले. गावाच्या विकासाची अस्था नसणारे सदस्य मतदारांनी निवडून दिल्याने मतदान करताना विचार करण्याची गरज आहे. कोणीही येत नसल्याने प्रशिक्षक म्हणून आलेल्या शासकीय प्रतिनिधींनी फोन लावून काही सदस्य बोलावून घेऊन स्वाक्षऱ्या घेऊन कार्यशाळा झाली म्हणून कागदोपत्री दाखवण्याचा डाव आखला, परंतु आडस ग्रा. पं. सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी हा डाव उधळून लावला. याची माहिती केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांना दिली. त्यांनी याची दखल घेऊन प्रशिक्षक म्हणून आलेले विस्तार अधिकारी यांना उद्या गुरुवारी ( दि. २९ ) घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एका जागरुक ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांच्यामुळे ही म्हत्वाची कार्यशाळा होणार आहे. परंतु उद्या तरी यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक उपस्थित रहातील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »