आडस येथे हर घर झेंडा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आडस : केज तालुक्यातील आडस येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात धारुर पोलीसांकडून हर घर झेंडा विषयी व किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
देशाच्या ७५ अमृतमहोत्सव वर्षा निमित्ताने प्रत्येक घरावर १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस राष्ट्रीय ध्वजारोहण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी हर घर झेंडा अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी राष्ट्र ध्वजाचा अवमान होउ नये म्हणून धारुर पोलीस ठाणे कडून येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात बुधवारी ( दि. ३ ) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी किशोरवयीन मुले -मुलींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोणी त्रास देत असेल अथवा बाल विवाह, बाल मजुरी हा गुन्हा आहे. असे प्रकार कुठे होत असतील तर पोलीस, शिक्षकांना माहिती देण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, पत्रकार रामदास साबळे, सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.