तिघांनी काढला प्रेयसीच्या पतीचा काटा; आरोपींमध्ये पुतण्या आणि भाच्याचा समावेश
अनैतिक नशेत नात्याला फासला काळिमा

माजलगाव तालुक्यातील एक व्यक्ती मागील ९ महिन्यांपासून गायब होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले. सदरील व्यक्तीचा खून झाला असून, या मागील धक्कादायक कारण ही समोर आले. मयताच्या पत्नीचे तिघा जणांसोबत अनैतिक संबंध होते. यात तो अडसर ठरत असल्याने तिघांनी कट रचून खून केला. तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये पुतण्या आणि भाच्याचा समावेश असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे.
दिगांबर हरिभाऊ गाडेकर रा. बाभळगाव ( ता. माजलगाव ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. हे हरवल्याची तक्रार कुटुंबियांकडून सप्टेंबर २०२१ दिंद्रुड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलीस शोध घेत होते. दरम्यान ११ मे रोजी बापूराव डोके यांच्या शेतातील शेलगावथडी शिवारातील विहिरीत माणसाचा कमरेखालील भाग आढळून आला. याचा तपास करताना पोलीसांना मयताच्या पँटच्या खिशात काही फोटो सापडले त्यावरून मयताची ओळख पटली. पोलीस पथक मयताच्या घरी गेले असता त्यांना पत्नी घरी मिळून आली नाही. या दिशेने पोलीसांनी तपास सुरू करत गणेश नारायण गाडेकर ( पुतण्या ), भाचा सोपान सोमनाथ मोरे ( भाचा ), बाळासाहेब जनार्धन गोंगाने यांच्या पर्यंत पोहचला यांच्याकडे चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. या तिघांचे दिगांबर यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात दिगांबर अडसर ठरत असल्याने तिघांनी दिगांबर यांचा कुऱ्हाडीने खून केला. नंतर दोन तुकडे करुन ते पोत्यात भरून विहिरी फेकून दिले. या तिन्ही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एएसपी पंकज कुमावत, प्रशिक्षणार्थी आयपीएस रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करुन एका आव्हानात्मक घटनेचा छडा लावण्यात आला.
खिशातील फोटो वरुन लागला सुगावा
खून करुन आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे दोन टुकडे करुन ते विहिरीत फेकून दिले. परंतु अंगावरील पँटच्या खिशात काही महिलांचे फोटो मिळून आले. त्या महिलांचा शोध घेऊन चौकशी केली. त्यांनी दिगांबर हरिभाऊ गाडेकर यांच्याकडे फोटो दिले होते. ते निराधारांचे पगार सुरू करुन देत असे, तसेच दिगांबर हे निराधार समितीचे माजी सदस्य होते. या पगारी सुरू करण्यासाठी फोटो देण्यात आले होते.