कृषी

५० गुंठ्यांत १ लाखांचे उत्पन्न: हा शेतकरी म्हणतो, ‘राजमा’ ने तारले

१६ क्विंटल उत्पादन ६ हजार ३०० रु. प्रतिक्विंटल मिळाला दर

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील आडस येथील शेतकऱ्याने ५० गुंठ्यांत वरुन हा राजमा वाण पेरला, १६ क्विंटल इतके भरघोस उत्पादन झाले असून प्रतिक्विंटल ६ हजार ३०० असा दर मिळाला. एकूण १ लाख ८०० रु. आर्थिक उत्पन्न मिळाले. कापूस, सोयाबीन, कांदा सह पडलेले दर पाहता राजमा ( घेवडा ) ने तारल्याची प्रतिक्रिया शेतकरी रमेश खाडे यांनी व्यक्त केली.

सध्या नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन, कापसाचे दर पडलेले आहेत. दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांना मालाचा साठा घरातच ठेवला असून अनेक शेतकऱ्यांकडे गतवर्षीचे सोयाबीन आहे. तसेच कापसाचीही थप्पी अद्याप घरात असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. कांद्याचे दर सध्या घसरले आहेत. म्हत्वाच्या पिकांचे दर घसरलेली असताना राजमा ( घेवडा ) हे पीक शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे. कमी दिवसांत व भरघोस उत्पन्न देणारे पीक म्हणून राजमा पुढे येत आहे. यावर्षी रब्बी व खरीपातही अनेक शेतकऱ्यांनी राजमाला पसंती दिली आहे. केज तालुक्यातील आडस येथील शेतकरी रमेश त्रिंबक खाडे यांनी ५० गुंठ्यांत वरुन या वाणाची बैल तीफणने ३५ किलो बियाण्याची पेरणी केली. यासाठी प्रथम पीक लहान असताना स्प्रिंक्लरच्या सहाय्याने दोन पाणी नंतर भूई पाठाने सहा पाणी दिले. तसेच यासाठी एक वेळा डीएपी खताची मात्रा व केवळ दोन फवारण्या केल्या आहेत. परंतु या शेतात प्रथम शेणखताचा वापर भरपूर प्रमाणात करण्यात आलं. ५० गुंठ्यांत १६ क्विंटल इतके भरघोस उत्पादन झाले. विक्री केली तेव्हा याला प्रतिक्विंटल ६ हजार ३०० असा समाधान कारक दर मिळाला. एकूण १ लाख ८०० रु आर्थिक उत्पन्न झाले. यासाठी पेरणी ते मळणी पर्यंत एकूण १५ ते १६ हजार रुपये खर्च आला. ८५ हजार निव्वळ उत्पन्न मिळाले. सोयाबीन, कापसाच्या थप्पी सध्या घरात असून दर वाढीची अपेक्षा आहे. परंतु दिवसेंदिवस दर घसरत आहेत. त्यामुळे या पिकांनी मारले पण राजमाने तारले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी रमेश खाडे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी विविध पिकांकडे वळावं
शेतकरी एक ते एकच पीक घेतात. काही वर्षांपूर्वी कापूस तर सर्वत्र कापूसच होते. यामुळे यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे उत्पादन घटले असल्याने कापूस दोन नंबरवर गेला. आज सोयाबीन क्षेत्रात वाढ होत ते एक नंबरवर आहे. परंतु यावरही एलो मोझॅक सह आदि काही रोंगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तर उत्पादन वाढल्याने दरही पडत आहेत. त्यामुळे याकाळात राजमा हा शेतकऱ्यांना आधार दिसत असून अशी अनेक पिकें असून ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकतात. यामुळे शेतकऱ्यांनी एकाच पिकांच्या मागे न लागता विविध पिके घेतली पाहिजे असे मत शेतकरी रमेश खाडे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »