rain update- बीड जिल्ह्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टी; पावसाचा पहिला बळी
इतरही भागात पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात बुधवारी रात्री बहुतांश ठिकाणी पाऊस ( rain update ) झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. परंतु अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा असून, बुधवारी ( दि. ५ ) सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच जोरदार पावसामुळे भिजलेली भिंत अंगावर पडून एका महिलेचा गेवराई तालुक्यात मृत्यू झाला. उशिरा का होत नाही पावसाला चांगली सुरवात झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
जून महिना संपला तरी पावसाविना पेरण्या खोळंबल्याने शेतकरी, व्यापारी व सामान्य माणूस चिंतेत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. पण पेरणी योग्य नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आहेत. बुधवारी ( दि. ५ ) दुपारी व रात्री बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विजेच्या तारा तुटल्या आहेत. बीड शहरातही बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी साचले असून काही घरात पाणी घुसले आहे. गेवराई तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे मातीची भिंत भिजून पडल्याने चहा बनवत असलेली वृध्द महिला सुमन शेषेराव अडागळे ( वय ६० वर्ष ) रा. धोंडराई ( ता. गेवराई ) यांचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा पावसाचा पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे.
या महसूल मंडळात अतिवृष्टी ( rain update )
तसेच कडा ( ता. आष्टी ) १२० मी.मी., सिरसदेवी ( ता. गेवराई ) ७७.८ मी.मी. , गंगामसला ( ता. माजलगाव ) १३२ मी.मी., युसुफ वडगाव ( ता. केज ) १०८ मी.मी., होळ ( ता. केज ) ७९ मी.मी. या सहा महसूल मंडळात बुधवारी अतिवृष्टीची नोंद झाली.
शेतकऱ्याची मूठ चाढ्यावर
शेतकऱ्यांनी जून महिन्या पुर्वीच शेतीची मशागत करून पेरणी योग्य केली. परंतु जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु मागील आठवड्यात व बुधवाऱ्याच्या पावसाने पेरणी योग्य ओल झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली आहे. परंतु अद्यापही बऱ्याच ठिकाणी पावसाची प्रतिक्षा आहे.