सायबर क्राईम! क्रेडिट कार्डवरुन परस्पर दोन लाख उचलले

लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : येथील एका महिलेला क्रेडिट कार्डवर स्कीम असल्याचा फोन आला. महिलेने स्कीम नको माझं क्रेडिट कार्ड बंद करा असे सांगितले. त्या ठगांनी ‘एनी डेस्क ‘ ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड करताच क्रेडिट कार्डवरुन २ लाख १६ हजार ३३२ रुपये उचलल्याची घटना शहरात शनिवारी ( दि. ९ ) सकाळी घडली.
सुत्रांच्या माहिती नुसार, अंबाजोगाई येथील नागरी रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या उषा गायकवाड असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना शनिवारी एक फोन आला. त्याने एसबीआय बॅंकेतून बोलतोय म्हणत ठगाने क्रेडिट कार्डवर स्कीम आहे असे सांगितले. परंतु उषा गायकवाड यांनी माझं क्रेडिट कार्डचं बंद करायचे आहे असे म्हटले. यासाठी त्या ठगाने एनी डेस्क हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. हा ॲप डाऊनलोड करताच सदरील कार्डवरून तब्बल २ लाख १६ हजार ३३२ रु. उचलल्याचा मेसेज आला. मेसेज पडताच गायकवाड यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठून अज्ञात ठगाच्या विरुद्ध तक्रार केली असून, अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.