जि.प. निवडणूकीची चाहूल! आडसकर, सोळंकेच्या दौऱ्यांनी आसरडोह गट ठरतोय प्रतिष्ठेचा
पाचपिंपळ तांड्यात सोळंकेचे मिटर वाटप तर आडसकरांकडून गुणवंतांचा गौरव

लोकगर्जना न्यूज
धारुर तालुक्यातील आसरडोह जि.प. गटावर सोळंके, आडसकर यांनी लक्ष केंद्रीत केले असल्याने हा गट प्रतिष्ठेचा ठरतं आहे. शुक्रवारी ( दि. १७ ) आमदार प्रकाश सोळंके यांनी पाचपिंपळ तांड्यात घरगुती विद्युत मिटर वाटपाचा कार्यक्रम घेतला तर, आज शनिवारी ( दि. १८ ) सकाळी रमेश आडसकर यांनी १०,१२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. पुढाऱ्यांचे वाढते दौरे व कार्यक्रम पहाता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांची ही चाहूल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
आसरडोह गट आडसकरांचा बालेकिल्ला समजला जातो. आत्ताच पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निकालातून ते दिसून येईल. या गटावर पकड मजबूत करण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी ही लक्ष घातले असून, अनेक गावांत त्यांचा गट निर्माण केला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकाही आता होतील मागील काही दिवसांपुर्वी जि.प. व पं.स. गट,गणाची घोषणा केली आहे. त्यावर हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुक आतापासूनच गाठीभेटी घेत साखर पेरणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश सोळंके यांनी आसरडोह गटाला टार्गेट करत गाठीभेटी सुरू केल्या आहेत. पाचपिंपळतांडा येथील थकबाकीमुळे अनेकांचे मिटर तोडून नेमण्यात आले होते. ते मिटर पुन्हा प्रकाश दादांनी बसवून दिले असल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्या मिटर वाटपाचा जाहिर कार्यक्रम शुक्रवारी ( दि. १७ ) पाचपिंपळ तांडा येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. याची आसरडोह गटात चांगलीच चर्चा रंगली आहे तसेच यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. बालेकिल्ल्यात येऊन आमदार सोळंकेनी कार्यक्रम घेतला म्हणल्यावर आडसकर तरी कसे शांत रहातील, रमेश आडसकर यांनीही शनिवारी ( दि. १८ ) सकाळी पाचपिंपळ तांडा येथे जाहिर कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांनी इयत्ता १० व १२ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन गौरव केला. तांड्यावरील ग्रामस्थांशी संवाद साधला. परंतु अचानक मोठं मोठे पुढारी तांड्यावर येत असल्याने, तसेच मागील १० ते १२ वर्षांपासून पाचपिंपळ तांडा मिटर नसल्याने अंधारात होता परंतु कोणीही लक्ष दिले नाही. आता चक्क आमदारांनी मिटर वाटपाचा कार्यक्रम घेतला. तर कधी नव्हे ती १०, १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी पुढारी तांड्यावर आलं. ही जिल्हा परिषद निडणूकीची चाहूल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच दोन मातब्बर पुढाऱ्यांनी लक्ष घातल्याने आसरडोह गटाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार असे दिसून येत आहे.