शेतकरी हिताची मागणी; महाराष्ट्रात सरकार पडणार की, रहाणार? सर्व या चिंतेत असताना खा. अमोल कोल्हे शेतकऱ्यांच्या मदतीला

लोकगर्जना न्यूज
राज्यात राजकारण तापलेले असून प्रत्येकाला महा विकास आघाडीचे सरकार पडणार की, रहाणार? ही चिंता दिसत आहे. परंतु याही परिस्थितीत जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांसाठी खा. अमोल कोल्हे मदतीला धावून आले. त्यांनी खत लिंकिंग प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे कृषी आयुक्तांकडे केली.
महारष्ट्र राज्यात सध्या हाय होल्टेज राजकीय ड्रामा सुरू आहे. शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळी मुळे ठाकरे सरकार पडणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावरच सर्वत्र चर्चा सुरू असून याची चिंता अधिक दिसून येत आहे. यामध्ये सर्व राजकीय पक्ष व त्यांचे नेते, मिडिया व्यस्त आहे. जून ची २२ तारीख होऊन गेली राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांना पीककर्ज अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे घेण्यासाठी बँकेचे उंबरे झिजवत आहे. जवळचे पैसे घेऊन अथवा कीडूकमिडूक विकून खत, बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर गेलं तर बियाणे टंचाई, खत घ्यायचं तर त्यासाठी लिंकिंग, गरज नसताना इतर खंत विनाकारण शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहेत. हे लिंकिंग कंपन्यानी सुरू केली आहे. त्यामुळे कृषी दुकानदारांना ते शेतकऱ्यांना द्यावे लागते आहे. यामुळे शेतकरी व दुकानदारांमध्ये खटके उडत आहेत. गरज असल्याने नाविलाज म्हणून शेतकरी खत घेत आहेत. परंतु यावर कोणीच बोलण्यासाठी तयार नाही. परंतु खा. अमोल कोल्हे यांनी लिंकिंग प्रश्नी लक्ष घातले आहे. या प्रकरणी कृषी आयुक्त धीरज कुमार यांना पत्र लिहून खत लिंकिंग प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. याची कृषी आयुक्तांनी दखल घेऊन कारवाई केली तर, नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.