अवकाळीचा पिंपळनेर परिसराला तडाखा ज्वारी भुईसपाट तर धुक्याने पालेभाज्यांचे नुकसान

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा ज्वारी पिकाला मोठा फटका बसला असून पीक भुईसपाट झाले. रात्री पाऊस झाल्याने सकाळी धुके पडल्याने कांद्यासह पालेभाज्यांचे आणि फुलात असलेल्या हरभरा पीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पिंपळनेर आणि परिसरात बुधवारी ( दि. २९ ) हलक्याशा वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याच परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर झाला असून बहरात असलेली ज्वारी भुईसपाट झाली आहे. यामुळे ज्वारीचे अंशी टक्के नुकसान झाले असून ज्वारीचे कणीस भरणार नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या ज्वारीचा केवळ चारा म्हणूनच शेतकऱ्यांना आता वापर करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे धुके पसरल्याने गहू, हरभरा, कांदा पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच पालेभाज्याही धुक्यामुळे नुकसानीत सापडल्या असून संकटाची मालिका सुरुच असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.