आपला जिल्हा

लोखंडी सावरगाव-पाडळसिंगी राज्यरस्ता २३२ साठी रस्तारोकोचा इशारा

काम सुरू नाही केले तर १० नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग अडवणार - सुनील जाधव

लोकगर्जनान्यूज

बीड : लोखंडी सावरगाव ते पाडळसिंगी राज्य रस्ता क्रमांक २३२ अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेला आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्याचे सध्या केवळ अवशेष शिल्लक असून, ठिगळ बुजवून गुत्तेदार न पोसता हा रस्ता नवीन करावा अन्यथा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच सुनील जाधव जयराम तांडा ( ता. गेवराई ) यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला.

लोखंडी सावरगाव, आडस, धारुर,चिंचवण, वडवणी, ताडसोन्ना, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव, पाडळसिंगी असा हा ८५ कि.मी. राज्य रस्ता क्रमांक २३२ आहे. हा रस्ता केज, माजलगाव, गेवराई या तीन विधानसभा मतदारसंघातून जातो. तीन आमदार, एक खासदार यांचे या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष आहे. याचा परिणाम म्हणून हा रस्ता पुर्णपणे खड्ड्यात हरवला आहे. यामुळे हा लातूर-औरंगाबाद ३० कि.मी. अंतर कमी होत असलेतरी वाहनधारक जास्त इंधन जाळून बीड-मांरसुंबा-केज-लोखंडी सावरगाव असा वळसा घालून जाणे पसंत करतात. मागील दोन दशकांपासून तर केवळ या मार्गावरील खड्डे बुजवून गुत्तेदार पोसण्याचे काम बांधकाम विभाग करत आहे. सध्या आडस ते धारुर व धारुर ते वडवणी दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. खड्डे बुजवून घेतलें की, ते महिन्यात उखडून जातात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. अशीच अवस्था पिंपळनेर-पाचेगाव-पाडळसिंगी दरम्यान आहे. पाचेगाव व परिसरातील नागरिकांना कुठेही चायचे असेल तर हाच रस्ता आहे. तो पुर्णपणे उखडून गेला आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन वर्षभरात ८ ते १० जणांचा बळी जात असल्याचा धक्कादायक दावा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. खड्डे न बुजता हा रस्ता नवीन करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. १० नोव्हेंबरच्या आत याबाबत निर्णय नाही घेतला तर १० नोव्हेंबर रोजी धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा गेवराई तालुक्यातील जयराम तांडा येथील उपसरपंच सुनील जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »