माणुसकी आली धाऊन! निराधार व्यक्तीचा डॉ. जाजु, पत्रकारांनी केला अंत्यविधी

बीड : महाराष्ट्रापासून भोंग्यावरून सुरू झालेलं जातीपातीचे राजकारण ज्ञानवापी मस्जिद पर्यंत पोचले असून, याचा सामान्य जनतेवर कोणताही परिणाम दिसत नसून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीड येथील आजची घटना म्हणता येईल. एका निराधार व आर्थिक दुर्बल व्यक्तीचे निधन झाले. त्या व्यक्तीचे अंत्यविधी कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला. नेत्ररोग तज्ञ डॉ. राधेश्याम जाजु यांनी पुढाकार घेऊन याबाबत येथील मुस्लिम पत्रकारांना याबाबत सांगितले. पत्रकारांनीही होकार दिला. डॉ. जाजु आणि मुस्लिम पत्रकारांनी एकत्र येऊन त्या मृतदेहावर हिंदू रितीरिवाज प्रमाणे अंत्यविधी केला. यावेळी केवळ माणूसकी हाच धर्म म्हणून मदत करत जातीपातीचे ध्रुवीकरण करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली.
याबाबत अधिक वृत्त असे की, मागील आठवडाभरापासून जिल्हा रुग्णालय, बीड येथे उपचार घेत असलेले लखन मारुती जाधव ( वय ५० वर्ष ) रा. रिलायन्स पेट्रोल पंप जवळ बीड यांचे ( दि. २० ) संध्याकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न समोर आला. मयत लखन जाधव यांना मूलबाळ नसल्याने अंत्यविधी करायचा कसा? घरची परिस्थिती अतिशय बिकट. मग खर्च कोण करणार ? अंत्यविधीसाठी पुढे कोण येणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. राधेश्याम जाजू यांना ही घटना समजली त्यांनी माणुसकीच्या दृष्टीने अंत्यविधीचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली तर, सायं दै. सिटीझनचे निवासी संपादक रफिक पठाण , सहसंपादक शेख वसीम , पत्रकार अमजदखान , वाहन चालक शेख शाहिद , वाहन चालक रोहिदास घाडगे आदींनी बीड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमी अंत्यविधीची तयारी केली. आज शनिवार ( दि. २१ ) सकाळी मयत लखन जाधव यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला. या दाखवलेल्या माणूसकी बद्दल डॉ. राधेश्याम जाजू यांच्यासह पत्रकार रफिक पठाण , शेख वसीम , अमजदखान , वाहन चालक शेख शाहिद , वाहन चालक रोहिदास घाडगे यांचे कौतुक करण्यात येत आहे. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असल्याचे मत या घटनेने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.