ई-पीक पाहणी शेतकरी २० तारखेपर्यंत करु शकतात

बीड : ई-पीक पाहणीची मुदत वाढवून २० तारखेपर्यंत केली असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण ई-पीक पाहणी सुरू होऊन ही ॲप १५ दिवस चाललेच नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी रखडली असून शासनाने मुदतवाढ केवळ ६ दिवस दिल्याने नाराजी व्यक्त करीत १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
खरीप हंगामात १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर ही शासनाचा सातबारावर पेरा घेण्याचा काळ समजला जातो. पण जुनी पद्धत ही अधिक किचकट आणि प्रत्येकाच्या बांधावर जाऊन अथवा प्रत्येक शेतकऱ्याची भेट नोंद घ्यावी लागत असे, जवळपास सर्वच तलाठी हे सज्जावर न राहता तालुक्यावरुन कारभार हाकत असल्याने नोंद मनानेच करण्यात येत होती. परंतु पीक विमा, पीक नुकसान अनुदान, पीक कर्ज आणि बाजारात भाव कमी असला की, शासनाकडून हमीभाव केंद्र सुरू करुन खरेदीसाठी पिकांच्या नोंद अन् प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत असे, याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासनाने ई-पीक पाहणी डिजीटल केली. आता शेतकऱ्यानेच मोबाईल मध्ये डीसीएस ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करुन त्या माध्यमातून ई-पीक पाहणी करुन पिकांची नोंद सातबारावर करायची आहे. १ ऑगस्ट पासून ई-पीक पाहणीला सुरुवात झाली होती. शासन व प्रशासनाच्या आवाहन नुसार शेतकऱ्यांनी नवीन ई-पीक पाहणी डीसीएस ॲप डाऊनलोड केला. पण सुरुवातीचे पंधरा दिवस काही तो चाललाच नाही. यामुळे दररोज ॲप उघडून पाहिले तर ई-पीक पाहणी काही झाली नाही. ॲप उघडत नसल्याने शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने पीक पाहणीची गती मंदावली, शेवटची तारीख १४ सप्टेंबर असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीसाठी धावपळ सुरू केली पण पाऊस, तसेच शेतातील चिखल यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पीक पाहणी रखडली आहे. आज दि.१४ वेळ संपत असल्याने शनिवारी (दि.१३) शासनाने आदेश काढून ई-पीक पाहणीची तारीख २० सप्टेंबर केली आहे. यामुळे ६ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पण सुरुवातीला हा ॲप तब्बल १५ दिवस चाललाच नाही. यामुळे शासनाने १५ दावसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
